
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेसला गुरुवारी सीएसएमटी स्थानकावरुन मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यामुळे कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, सीएसएमटी–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. या गाडीच्या तिकीटांच्या आरक्षणासही सुरुवात झाली आहे.
या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही नियमित सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
नवीन दैनिक एक्स्प्रेसच्या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान दैनिक एक्सप्रेस गाडी क्रमांक १५०८७ आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दरम्यान दररोज धावणार आहे.
गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज सीएसएमटी येथून रात्री ११.५५ वाजता सुटेल व ती दुपारी १.५० वाजता पोहोचेल. परतीची गाडी १५०८८ सावंतवाडी रोड –सीएसएमटी एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकावरुन सायंकाळी ५ वाजता सुटून पहाटे ६.४० वाजता पोहचेल.
'या' स्थानकांवर थांबा
या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत.
असे आहेत 'तिकीट दर'
या एक्सप्रेसमध्ये वातानुकूलित प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीसह शयनयान आणि सामान्य श्रेणीचे डबे उपलब्ध असतील. तिकीट आरक्षणाच्या संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शयनयान श्रेणीचे तिकीट दर ३८५ रुपये, तृतीय श्रेणी वातानुकूलित इकॉनॉमीचे तिकीट दर ९४० रुपये, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे तिकीट दर १,०२० रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे तिकीट दर १,४४० रुपये, वातानुकूलित प्रथम श्रेणीचे तिकीट दर २,३९० रुपये असणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










