LIVE UPDATES

खेर्डी एमआयडीसीतील फर्निचर कारखान्याला भीषण आग

आगीने कारखाना क्षणार्धात घेतला कवेत; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 24, 2026 11:40 AM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

चिपळूण :  शहरालगतच्या खेर्डी एमआयडीसी परिसरातील फर्निचर तयार करणाऱ्या एका कारखान्याला गुरुवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. फर्निचर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लाकूड व अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरल्याचे दिसून आले. 

रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, खेर्डी एमआयडीसीमध्ये स्वतंत्र फायर स्टेशन उभारण्यात आले असले, तरी या ठिकाणी स्वतंत्र अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत असताना तत्काळ अग्निशमन सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच ठाकरे सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम, चिपळूण नगरपालिकेचे बांधकाम सभापती कपिल शिर्केयांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रवादीचे नेते नितीन ठसाळे हे मुंबई येथूनही जमेल त्या पद्धतीने मदतकार्यात योगदान देत होते.

आगीची तीव्रता पाहण्यासाठी तसेच परिस्थिती जाणून घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीचा तपशील अग्निशमन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.