
राजापूर : ताम्हाणे गडगाववाडी येथील रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे तातडीने मजबूतीकरण, डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत नवतरुण विकास मंडळ, मुंबई (रजि.) यांच्या वतीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्यापही हा रस्ता दुर्लक्षित आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ताम्हाणे गडगाववाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता सध्या खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक वर्षांपासून खडीकरण करून केवळ पॅचवर्क करण्यात आले असून, कालांतराने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. किमान १५ वर्षे उलटूनही रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना आपल्या वाडीत जाण्या-येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून वाहन चालविताना अडचणी निर्माण होत असून, एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला उपचारासाठी नेण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत अनेकदा आश्वासने मिळाली; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, अशी नाराजीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी नवतरुण विकास मंडळ व ताम्हाणे गडगाववाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.










