
दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील शेतकऱ्यांना सध्या ई-पीक नोंदणी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. DCS ॲपवर साटेली-भेडशी गावाच्या सर्वे क्रमांकाची नोंद करताना नकाशावर साटेली-भेडशीऐवजी ‘सासोली’ गाव दाखविले जात असल्याने पुढील ई-पिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
ई-पिक नोंदणीसाठी DCS ॲपवर साटेली-भेडशी येथील संबंधित सर्वे क्रमांक टाकल्यानंतर पुढील माहिती भरताना नकाशावर चुकीच्या पद्धतीने ‘सासोली’ गाव दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीची योग्य नोंद करता येत नसून ई-पिक नोंदणीची प्रक्रिया रखडली आहे.
ई-पिक नोंदणी ही विविध शासकीय योजना, कृषी अनुदान, पीकविमा तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभांसाठी महत्त्वाची असल्याने या तांत्रिक त्रुटीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. वेळेत नोंदणी न झाल्यास पात्र असूनही काही शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
या समस्येबाबत संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन DCS ॲपवरील गावाच्या नकाशातील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करावी आणि साटेली-भेडशी गावाची योग्य नोंद उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लोकप्रतिनिधी तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तांत्रिक अडचण दूर करावी आणि साटेली-भेडशीतील शेतकऱ्यांची ई-पिक नोंदणी सुरळीत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.











