
सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसच्या नवीन इमारतीचे काम कोकण रेल्वेनं सुरू केलं होतं. मात्र, ही इमारत उभी राहिल्यास पाचव्या फलाटसाठी जागा राहणार नव्हती. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून हा मुद्दा माझ्या निदर्शनास आणून दिल्याने कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांची मी भेट घेत चर्चा केली. या कामाला १५ दिवसाची स्थगिती दिली असून चांगल स्टेशन व पाचवा प्लॅटफॉर्म अस्तित्वात आल्यावर गाड्या थांबण्याच प्रमाण देखील वाढेल. पाचव्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म व टुरिस्ट फॅसिलिटीचे काम एकाचवेळी घेण्यात यावे असे बैठकीत सुचविण्यात आल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, फलाट क्रमांक ४ वर पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न होता. मात्र, कॉलमच काम करताना केबल तुटून रेल्वेची सेवा ठप्प झाली असती. त्यामुळे हा निधी शेजारील जमीनीसाठी ठेवला असून तो अखर्चित आहे. पाचव्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म व टुरिस्ट फॅसिलिटीचे काम एकाचवेळी घेण्यात यावे असे मी सुचवले असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच टीम याची पाहणी करणार आहे. तोपर्यंत सुरू असलेल्या कामाला १५ दिवसाची स्थगिती दिली आहे. त्यामुळे चांगलं स्टेशन व पाचवा प्लॅटफॉर्म अस्तित्वात आल्यावर गाड्या थांबण्याच प्रमाण वाढेल. गाड्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्डकडून योजना मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. तिलारीच्या या योजनेतून मळगावसह न्हावेली, निरवडे, वेत्ये गावांना पाणी दिलं जाणार असून हे पाणी पुढे चीपी विमानतळापर्यंत पोहचवल जाणार आहे.
दरम्यान, फ्लाय ओव्हरसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे बैठकीची मागणी केलीय. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना देखील उपस्थित राहण्याची विनंती करणार आहे. तर मळगाव-रेडी रस्त्यासाठी ३०० कोटी रुपये मंजूर झाले असून शक्तीपीठचा रेडी बंदराला कनेक्टर मळगाव मार्गे नेण्याची योजना आहे. चौकुळ, आंबोलीलाही कनेक्टर द्यायचे ठरले आहे. त्यामुळे हा रस्ता सिंधुदुर्गात येऊन थांबले व नॅशनल हायवेने लोक गोव्याला जातील.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबतची बैठक होणार असून त्याला मंजूरी मिळेल. यामुळे सावंतवाडीसह कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड च्या पर्यटन स्थळाला यामुळे चालना मिळणार आहे. कोकण एक्स्प्रेस वे, कोस्टल रोड व नॅशनल हायवे हे तिन्ही या रस्त्याला जोडले जाणार असून प्रगतिची नवी दिशा प्राप्त होणार असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.










