LIVE UPDATES

Kudal News : कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात भव्य जनजागृती बाईक रॅली

'सेवा संकल्प अभियाना'निमित्त आयोजन : शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 24, 2026 15:58 PM
views 56  views

कुडाळ : महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रमांची सुरुवात करण्यात आली असून, २३ सप्टेंबर रोजी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात जनजागृती बाईक रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

शहरी भागात बाईक रॅली काढून 'विकसित भारत २०४७' चे उद्दिष्ट साध्य करणे तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. कुडाळ शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रॅलीच्या मार्गावर नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक आणि जनजागृतीपर संदेश लावण्यात आले होते.

या बाईक रॅलीमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीतील युवकांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. रॅलीच्या माध्यमातून 'स्वच्छता ही सेवा', प्लास्टिकमुक्ती, डिजिटल साक्षरता आणि लोकसहभागाची भावना शहरात दृढ करण्यात आली.

नगरपंचायत कार्यक्षेत्रात 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, अनाथालय भेट, जलसंधारण आणि जलस्रोत स्वच्छता असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. तसेच आगामी महिन्याभरात शहरात वृद्धाश्रम भेट, ज्येष्ठांसाठी डिजिटल साक्षरता, व्यसनमुक्त भारत, सेवा सेतू अभियान, बदलाची गोष्ट आणि जनसेवक महाकुंभ यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत.