
मुंबई : मुंबईतील आमदार निवासाच्या इमारतीची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच आमदार निवासाच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचे प्लास्टर अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. याआधीही अनेकदा आमदार निवास इमारतीमधील दुरवस्थेचे प्रकार समोर आले होते. मात्र, या ताज्या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा उघड झाला आहे. शनिवार असल्याने विधानभवनाचे कामकाज बंद होते. त्यामुळे बहुतांश आमदार त्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते आपापल्या घरी गेले होते. घटना घडली त्याठिकाणी त्यावेळी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यभरातून आलेले अनेक आमदार आणि त्यांचे प्रतिनिधी दक्षिण मुंबईतील या विस्तारित आमदार निवासात वास्तव्यास असतात. जर सुट्टीचा दिवस नसता आणि तिथे नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ असती, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.














