
सिंधुदुर्गनगरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२० गावांमधील एकूण ३ हजार ६७४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांमधील २ हजार ७५७ शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांमधील ९१७ शेतकरी पात्र ठरले आहेत. तालुकानिहाय आकडेवारीनुसार कणकवली तालुक्यात सर्वाधिक ८२९ शेतकरी पात्र ठरले असून, कुडाळमध्ये ६३५, सावंतवाडीमध्ये ४९३, देवगडमध्ये ८०८, मालवणमध्ये ३९४, वेंगुर्लेमध्ये २५९, वैभववाडीमध्ये ३६५ आणि दोडामार्गमध्ये १४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 'ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी' असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकची नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, कर्ज खात्याचे पासबुक तसेच बचत खात्याचे पासबुक सोबत घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावर जावे. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असून, कोणत्याही केंद्रावर आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था कार्यालये, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालय तसेच तालुका सहायक निबंधक/सहकारी अधिकारी (श्रेणी-१) यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून शेतकरी बांधवांनी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग प्रदीप मालगावे यांनी केले आहे.














