
सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सध्या एक अत्यंत अस्वस्थ करणारे आणि विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी गुणवत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या या जिल्ह्यात आज 'शाळा आहेत, शिक्षक आहेत... पण विद्यार्थीच गायब होत आहेत!' अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण १,३४४ शाळांपैकी तब्बल ५५९ शाळा या १० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. म्हणजेच जिल्हयातील जवळपास ४१ टक्के शाळा आज पटसंख्येअभावी व्हेंटिलेटरवर आहेत.
या चिंताजनक आकडेवारीवर नजर टाकल्यास, १ विद्यार्थी असलेली ३८, २ विद्यार्थी असलेल्या ६६, ३ विद्यार्थी असलेल्या ६८, ४ विद्यार्थी असलेल्या ६७, ५ विद्यार्थी असलेल्या ६३, ६ विद्यार्थी असलेल्या ५५, ७ विद्यार्थी असलेल्या ६०, ८ विद्यार्थी असलेल्या ४७, ९ विद्यार्थी असलेल्या ४७ आणि १० विद्यार्थी असलेल्या ४८ शाळा जिल्ह्यात सुरू आहेत. यातील २६९ शाळा तर एकशिक्षकी आहेत. अशातच नुकतीच जिल्ह्यात २८० नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती झाल्याने प्रशासकीय स्तरावर शिक्षकांची उपलब्धता वाढली असली, तरी 'वर्ग रिकामे अन् शिक्षक जास्त' असा विचित्र विरोधाभास निर्माण झाला आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला कल, रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर आणि कमी झालेला जन्मदर ही पटसंख्या घटण्याची प्रमुख कारणे असली, तरी एखादी सरकारी शाळा बंद पडणे म्हणजे केवळ एक इमारत कुलूपबंद होणे नव्हे, तर त्या गावाचा सांस्कृतिक आणि सामाजिक कणा मोडण्यासारखे आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरीब मुलांचे शिक्षण कायमचे दुरापास्त होऊ शकते.
शासकीय भरतीमुळे शिक्षकांना रोजगार आणि वेतन तर मिळाले, पण आता ‘आपली शाळा टिकवणे आणि पटसंख्या वाढवणे’ हे शिक्षकांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून केवळ नियमाप्रमाणे तासिका घेण्यापलीकडे जाऊन शिक्षकांना आता क्रांती घडवावी लागेल. इंग्रजी शाळांपेक्षा चांगल्या दर्जाचे शिक्षण, डिजिटल वर्ग, आणि उपक्रमशील अध्यापनाच्या जोरावर पालकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल.
शिक्षकांनी थेट घराघरांत जाऊन पालकांशी संवाद साधत लोकसहभाग वाढवला, तरच या शाळा वाचू शकतील. सिंधुदुर्गातील या ५५९ शाळांना बंद पडण्यापासून वाचवायचे असेल, तर प्रशासनापेक्षाही ‘गुरुजींची निष्ठा आणि पुढाकार’ हाच एकमेव संजीवनी उपाय ठरू शकतो; आणि शाळा वाचवण्याची हीच खरी धुरा आता शिक्षकांनाच आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे.
'शाळा वाचवण्याची' खरी जबाबदारी शिक्षकांचीच!
शासकीय भरतीमुळे शिक्षकांना रोजगार मिळाला, वेतन मिळाले; पण आता ‘आपली शाळा टिकवणे आणि वाढवणे’ हे शिक्षकांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शिक्षकाने हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. केवळ नियमाप्रमाणे तासिका घेण्यापलीकडे जाऊन शिक्षकांना आता क्रांती घडवावी लागेल.
शिक्षकांनी नेमके काय करायला हवे?
१) इंग्रजी शाळांपेक्षा चांगल्या दर्जाचे, स्पर्धा परीक्षाभिमुख आणि संकल्पनाधारित शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच मिळते, असा विश्वास पालकांमध्ये निर्माण करावा लागेल.
२) शाळा 'स्मार्ट' व आकर्षक बनवणे: तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल वर्ग, उपक्रमशील शिक्षण आणि खेळातून शिक्षण यावर भर द्यावा लागेल.
३) पालकांशी आणि गावाशी थेट संवाद: शिक्षकांनी वर्गाबाहेर पडून घराघरांत जाऊन पालकांचे प्रबोधन केले पाहिजे. "आमची शाळा सरकारी असली, तरी दर्जा खासगीपेक्षा उत्तम आहे," हे पटवून द्यावे लागेल.
४) लोकसहभाग वाढवणे: गावातील ग्रामपंचायत, तरुण मंडळे आणि ग्रामस्थांना शाळेच्या विकासात भागीदार करून घ्यावे लागेल.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










