
सिंधुदुर्ग : चांगले शिक्षण, मुंबईतील वेगवान जीवनशैली आणि विप्रोसारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी... करिअरमध्ये स्थैर्य आणि प्रगतीची संधी असतानाही एका तरुणाने या सगळ्याला वेगळी दिशा देण्याचा निर्णय घेतला. शहरातील सुरक्षित करिअर सोडून गावच्या मातीत परतत ‘गावासाठी काहीतरी करायचे’ या ध्येयाने वारंगांची तुळसुली ता. कुडाळ येथील सागर सुरेश वारंग याने ग्रामीण विकासाची वाट निवडली.
आज ‘सिंधुको’ या उपक्रमाच्या माध्यमातून ते गावातील छोटे शेतकरी, तरुण आणि स्थानिक उद्योजकांना एकत्र आणून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि त्यांच्या शेतमालासाठी शहरातील बाजारपेठ उपलब्ध करून देत अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण करणे, तसेच ग्रामीण तरुणांना शाश्वत व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या वाटा दाखवणे, हा त्यांच्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.
मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून गावाकडे परतण्याचा निर्णय
आजच्या काळात नामांकित कंपनीतील नोकरी मिळवणे आणि ती टिकवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र, सागर वारंग यांने या सर्वसामान्य वाटेपेक्षा वेगळी वाट निवडली. विप्रोसारख्या मोठ्या कंपनीतील नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी मुंबईची धावपळ मागे सोडून आपल्या गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ नोकरी सोडण्यापुरता मर्यादित नव्हता. गावातील वास्तव्य, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि ग्रामीण भागातील तरुणांपुढील संधींचा अभाव यांचा विचार करून त्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग गावाच्या विकासासाठी करण्याचे ठरवले.
शहरात स्वतःचे करिअर घडविण्याऐवजी गावातील अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याची दिशा त्यांने स्वीकारली.सिंधुदुर्गातील अनेक शेतकरी आजही छोट्या क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने शेती करतात. मेहनत आणि उत्पादन असूनही बाजारपेठेची मर्यादा, योग्य दराचा अभाव आणि विक्री व्यवस्थेतील अडचणी यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. हीच समस्या लक्षात घेऊन सागरने शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर नव्हे, तर समुदायाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. शेतकऱ्यांना एकत्रितपणे प्रशिक्षण देणे, त्यांच्या गरजा समजून घेणे, शेतीविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि उत्पादित शेतमालाला शहरातील ग्राहक व बाजारपेठेशी जोडणे, या दिशेने ‘सिंधुको’ची वाटचाल सुरू आहे.
शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन वाढविणे पुरेसे नाही, तर उत्पादनाला योग्य बाजारपेठ आणि योग्य मूल्य मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. याच विचारातून ‘सिंधुको’ शेतकरी आणि शहरातील बाजारपेठ यांच्यातील दुवा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा शेतमाल थेट किंवा अधिक प्रभावी विक्री व्यवस्थेद्वारे शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना त्यांच्या नियमित शेती उत्पन्नासोबत अधिक उत्पन्न मिळवून देण्याची संकल्पना यामागे आहे.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कौशल्याची आणि कल्पकतेची कमतरता नाही; गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि संधीची. अनेक तरुण रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतात. मात्र, स्थानिक पातळीवरील संधी ओळखून त्यावर आधारित व्यवसाय उभारला, तर गावातच रोजगार निर्माण होऊ शकतो. हीच भूमिका घेऊन सागर वारंगांची तुळसुली तसेच परिसरातील गावांमधील तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. ‘सिंधुको’ची संकल्पना केवळ शेतमाल विक्री किंवा शेतकरी प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही. गाव, शेतकरी, तरुण या घटकांना एका साखळीत जोडून स्थानिक पातळीवर आर्थिक संधी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
विप्रोसारख्या मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून गावाकडे परतण्याचा निर्णय कदाचित पारंपरिक अर्थाने ‘करिअरचा’ निर्णय नसेल ; मात्र, गावातील शेतकरी, तरुणांसाठी संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने तो एका मोठ्या सामाजिक प्रवासाची सुरुवात आहे. शहरात स्वतःसाठी करिअर घडविण्याची संधी असताना गावासाठी परतण्याचा निर्णय घेणे हीच सागर वारंग यांच्या प्रवासाची वेगळी ओळख आहे.
'गावाकडे परतणे म्हणजे मागे जाणे नव्हे, तर गावातूनच नव्या संधींची निर्मिती करणे’, या विचाराला कृतीची जोड देत ‘सिंधुको’चा हा प्रयोग आकार घेत आहे. आज हा प्रवास सुरुवातीच्या टप्प्यात असला तरी त्यामागची दिशा स्पष्ट आहे. शेतकरी सक्षम करणे, तरुणांना गावातच संधी देणे आणि स्वावलंबी व शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करणे.मुंबईच्या कॉर्पोरेट जगतातील करिअर सोडून कोकणच्या तांबड्या मातीत परतून काहीतरी करण्याची धडपड करणाऱ्या आणि कोकणात रोजगार नाही असं म्हणनाऱ्यांना तो कृतीतून उत्तर देत आहे. त्याच्या प्रयत्नांना कोकणी माणसाने साथ देवो आणि यश येवो हीच अपेक
"सागरबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, तो यासाठी की त्याने मुंबईतील आपली फास्ट लाईफस्टाईल सोडून गावी समाधानी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आपल्या आई-वडिलांना या वयात शहरातील प्रदूषण, दगदग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर करून, गावी समाधानी आयुष्य जगण्याचा निर्णय त्याने घेतला...नक्कीच यामुळे त्याला बऱ्याच अडचणीतून सामोरे जावं लागल...पण आम्ही मिळून यातून मार्ग काढू. त्याने त्याचे करिअर, आमची काळजी आणि कुटुंबाची जबाबदारी यांचा अतिशय सुंदर समतोल साधला आहे."
सारिका वारंग, सागरची आई













