LIVE UPDATES

Konkan Rane Pattern : सक्सेसफुल ‘राणे पॅटर्न’ आता साताऱ्यात

कोकण आणि सातारा या दोन्ही भागांची राजकीय पार्श्वभूमी, समाजकारण आणि राजकारण वेगळे आहे. त्यामुळे एकाच राजकीय पॅटर्नची पुनरावृत्ती सर्वत्र यशस्वी ठरेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 19:28 PM
views 53  views
Political strategy of Rane brothers in Konkan and Gore brothers in Satara

देशाच्या राजकारणात भाजपचा भक्कम विस्तार होत गेल्यापासून राजकारणाची एक नवी परिभाषा तयार होत आहे. नवनवीन रणनीती लोकशाहीला धडका देत आहेत आणि त्यावरच लोकशाही आपले डोके आपटून घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजकीय व्यवस्थेतील या बदलांमधून काही ‘सक्सेसफुल पॅटर्न’ही समोर येत आहेत. त्यातीलच एक पॅटर्न म्हणजे राणे बंधूंनी कोकणात अत्यंत यशस्वीरीत्या वापरलेली राजकीय रणनीती. हाच पॅटर्न आता सातारा जिल्ह्यात आपले भविष्य आजमावताना दिसत आहे.

अर्थात, कोकण आणि सातारा या दोन्ही भागांची राजकीय पार्श्वभूमी, समाजकारण आणि राजकारण वेगळे आहे. त्यामुळे एकाच राजकीय पॅटर्नची पुनरावृत्ती सर्वत्र यशस्वी ठरेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील दिग्गज नेतृत्व असलेले खासदार नारायण राणे यांची राजकीय पार्श्वभूमी अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. संघर्ष हेच त्यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीचे ‘ओपन सिक्रेट’ मानले जाते. शिवसेना, काँग्रेस, त्यानंतर स्वतःचा पक्ष आणि आता भाजप, अशी राजकीय वाटचाल करताना त्यांना अनेक चढ-उतार आणि पराभवांचा सामना करावा लागला. मात्र, अखेर कोकणात एकहाती राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश राणे यांनीही लक्षणीय यश मिळवले. नितेश राणे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी आली.

निवडणुकीच्या काळात युतीधर्माचे पालन करणे आवश्यक असताना त्यातूनच एक धक्कादायक आणि वेगळा राजकीय पॅटर्न समोर आला. निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. युतीधर्माचे पालन करतानाच निवडणुकीच्या रणांगणात विजयासाठी आवश्यक असलेली प्रत्येक राजकीय खेळी खेळत अखेर त्यांनी आमदारकी खेचून आणली.

खरे तर सातारा जिल्हा हा पारंपरिकदृष्ट्या काँग्रेस विचारांचा जिल्हा मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले. मात्र, मध्यंतरीच्या काळात देशाच्या राजकारणात झालेले आमूलाग्र आणि धक्कादायक बदल साताऱ्यातही दिसू लागले. बघता बघता सातारा जिल्ह्यात कमळ फुलले आणि आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था ताब्यात घेण्यासाठी भाजपची वाटचाल सुरू आहे.

राज्यात महायुतीच्या माध्यमातून युतीधर्माचे पालन होत असले, तरी साताऱ्यात, म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ भूमीत शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपमध्ये ‘विळ्या-भोपळ्याचे सख्य’ असल्याचे चित्र पाहायला मिळते. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी झालेली साठमारी अजून ताजी असतानाच जिल्हा बँकेसाठीची सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

अशा परिस्थितीत आता गोरे बंधूंनी साताऱ्याच्या राजकारणाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. कोकणात जसा राणे बंधूंचा राजकीय प्रयोग पाहायला मिळाला, तसाच प्रकार आता साताऱ्यात घडताना दिसत आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या विजयात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, तेच त्यांचे बंधू शेखर गोरे आता शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहेत. या राजकीय निर्णयामागे अनेकांची वेगवेगळी रणनीती असू शकते. मात्र, या खेळीचा प्रत्यक्ष फायदा नेमका कोणाला होणार, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.

कोकणात यशस्वी ठरलेला हा ‘राणे पॅटर्न’ साताऱ्यातही यशस्वी होणार का? याबाबत राजकीय जाणकारांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे कोकणातील राजकीय पार्श्वभूमी आणि साताऱ्याची राजकीय रचना यामध्ये मोठा फरक आहे.

कोकणात नारायण राणे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या कार्यकर्त्यांना एक विशिष्ट शिस्त लावली आहे. प्रशासनावरही त्यांची मजबूत पकड राहिली आहे. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याचे धाडस करणारे फार कमी आहेत. भाजप आणि महायुतीची शिस्त, त्यासोबतच राणे कुटुंबीयांची स्वतंत्र राजकीय शिस्त, या सर्वांचा प्रभाव कोकणच्या राजकारणात स्पष्टपणे जाणवतो.

त्यांचा प्रदीर्घ राजकीय अभ्यास आणि अनुभव त्यांच्या प्रत्येक राजकीय खेळीत दिसून येतो. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांच्यासारखे कट्टर राजकीय विरोधकही आज नारायण राणे यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करताना दिसतात.

हे सर्व पाहता, शेखर गोरे यांना ‘राणे पॅटर्न’वरून चालताना अनेक राजकीय परीक्षा द्याव्या लागतील. अनेक अडथळे पार करून स्वतःला सिद्ध करावे लागेल. कारण हा केवळ राजकीय मुत्सद्देगिरीचा किंवा स्वतःच्या राजकीय सोयीचा भाग नाही.

हे पाऊल उचलताना आपण कोणत्या विस्तवावरून चालत आहोत, याचे भानही तितकेच महत्त्वाचे आहे. राणे पॅटर्नची नुसती नक्कल करून राजकीय यश मिळत नाही; त्यामागे संघटन, शिस्त, जनाधार, प्रशासनावरील पकड आणि योग्य वेळी योग्य राजकीय खेळी करण्याची क्षमता लागते. म्हणूनच आता खरा सवाल एकच, कोकणात गाजलेला ‘राणे पॅटर्न’ साताऱ्यातही राजकीय चमत्कार घडवणार, की गोरे बंधूंची ही खेळी उलटणार? याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.