LIVE UPDATES

बासरीवर साकारला श्रीकृष्णाचा सुबक चेहरा

गडमठच्या श्रुती सुतार यांची अनोखी कलाकृती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 04, 2026 11:03 AM
views 83  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत गडमठ येथील युवा चित्रकार श्रुती संतोष सुतार यांनी चक्क बासरीवर श्रीकृष्णाचे मनमोहक चित्र साकारून आपल्या कलेतून अनोखी कलात्मक भक्ती व्यक्त केली आहे. अवघ्या ७ सेंटीमीटर उंच आणि २ सेंटीमीटर रुंद असलेल्या या सूक्ष्म कलाकृतीने कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

  श्रीकृष्ण आणि बासरी यांचे नाते अतूट मानले जाते. बासरी म्हटले की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हटले की बासरी, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. याच भावनेतून ज्या बासरीमुळे श्रीकृष्णाचे रूप आणि त्यांच्या मधुर सुरांची अनुभूती मनात जागी होते, त्याच बासरीवर श्रीकृष्णाचे चित्र साकारण्याचा प्रयत्न केल्याचे श्रुती सुतार यांनी सांगितले.

 ही कलाकृती ऍक्रेलिक रंगांच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. श्रीकृष्णाची भक्ती आणि आपली कला यांचा संगम या छोट्याशा बासरीमध्ये साधण्याचा प्रयत्न केला असून, ही कलाकृती आपल्यासाठी केवळ चित्र नसून जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाला वाहिलेली कलात्मक भेट असल्याचे श्रुती यांनी सांगितले.

 श्रुती सुतार यांनी यापूर्वीही विविध माध्यमांवर सूक्ष्म चित्रकला साकारली आहे. रुईच्या पानावर हनुमान, गंधगोळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण, मोरपिसावर श्रीकृष्ण, तसेच सूक्ष्म टिकलीवर नऊ दुर्गांची चित्रे त्यांनी साकारली आहेत. याशिवाय सूक्ष्म टिकलीवर आशा भोसले यांचे चित्र आणि वीणेवर विठ्ठल-रुक्मिणी यांची कलाकृतीही त्यांनी साकारली आहे.अत्यंत लहान आकाराच्या विविध वस्तूंवर बारकाईने चित्र साकारण्याची त्यांची कला कौतुकास्पद ठरत आहे.