
सावंतवाडी : दोन वर्षांसाठी तीन जिल्ह्यांतून हद्दपार केलेल्या सावंतवाडीतील एकाने आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे गोमांसाची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीत उघडकीस आला आहे. सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गोमांस सदृश्य मांस, दुचाकी आणि हत्यार असा सुमारे १ लाख १७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बजरंग दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती पोलीसांना दिली होती. त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश लक्ष्मण शिंगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तडीपार मोहम्मद सरफराज बहुउद्दिन ख्वाजा (वय ४५, रा. घर क्र. १४५, बाहेरचावाडा, सावंतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास बाहेरचावाडा, सावंतवाडी येथील राहत्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी ख्वाजा हा आपल्या जुपिटर मोटरसायकलवरून (क्र. MH-07-AV-9779) संशयास्पदरित्या जात असताना पोलिसांनी त्याला रोखले. दुचाकीच्या डिकीची झडती घेतली असता, त्यात २४ काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले २४.८०० किलोग्रॅम वजनाचे गोमांस सदृश्य मांस आढळून आले. आरोपी मोहम्मद सरफराज ख्वाजा याला उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीचा आदेश २७/०६/२०२६ रोजी बजावण्यात आला होता व आरोपीने आपण गोव्यात राहणार असल्याचे लेखी दिले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करत तो गोमांसाची विक्री व वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. बजरंग दल सावंतवाडीच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी सरफराज ख्वाजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वी मारहाण, विनयभंग, बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हे तसेच गोवंश संरक्षण कायद्यान्वये ६ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून तपासासाठी घटनास्थळाला परि. डी.वाय.एस.पी. दीपक शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे यांनी भेट दिली. पोलीस अंमलदार श्री. परब यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि. श्री. हिंगे करत आहेत. आरोपीस अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.











