LIVE UPDATES

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 04, 2026 12:53 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी दिले जाणारे विविध जिल्हास्तरीय पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी जाहीर केलेत. यामध्ये समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. 

संस्थेचे माजी अध्यक्ष कै. तात्यासाहेब पोळके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'आदर्श समाजभूषण पुरस्कार' शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना जाहीर झाला आहे. गोरगरीबांना आर्थिक मदत, तरुणांना रोजगार आणि कोकणातील कला-संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे संस्थेनं सांगितले आहे.

तसेच माजी मुख्याध्यापक कै. जयसिंगराव पेडणेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार' इसुली नंबर ७ शाळेचे शिक्षक महेश लाड सावंत यांना जाहीर झाला आहे. तर कै. प्रमिला जाधव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'आदर्श उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार' पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयाच्या शिक्षिका सौ. अंकिता विलास मोडक यांना जाहीर करण्यात आला आहे. महेश सावंत यांनी विज्ञान, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि बालभारती इंग्रजी समितीत मोलाचे काम केले आहे, तर अंकिता मोडक यांनी दिव्यांग शिक्षण, साक्षरता उपक्रम आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या पुरस्कारांच्या निवडीसाठी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक राम राठोड आणि शिक्षक वर्गाने प्रस्तावांचे परीक्षण केले असून सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष सहकार्य केले.