
देवगड : आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून भाग्योदय विकास मंडळ, मुटाट (प्रभूवाडी) यांच्या वतीने यंदाही विविध आकर्षक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा दिनांक १४ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे वाडीत आगमन होणार असून, या आनंद सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांसाठी व कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
या वर्षीपासून नवीन उपक्रमांची सुरुवात:
पर्यावरणाशी समतोल राखता यावा यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून यंदापासूनच या उपक्रमांची सुरुवात करण्यात येत असून, या स्पर्धांचे हे पहिलेच वर्ष आहे. या वर्षी ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास, पुढच्या वर्षीपासून पर्यावरणपूरक गणपती मूर्तीसाठीदेखील स्पर्धा ठेवण्याचा मंडळाचा विचार आहे.
इतरही मंडळांनी अशा पर्यावरण पूरक उपक्रमातून हा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे
आयोजित करण्यात आलेले प्रमुख उपक्रम व स्पर्धा:
पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा: सजावटीमध्ये शक्यतो पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे बंधनकारक असून, "टाकाऊपासून टिकाऊ" ही संकल्पना विशेष महत्त्वाची राहील. सजावटीची कल्पकता, आकर्षणकता आणि पर्यावरणपूरकता या निकषांवर परीक्षण केले जाईल.
उत्कृष्ट ढोल वादक व ताशा वादक स्पर्धा: वादनातील कौशल्य, तालबद्धता, लयबद्धता आणि स्पर्धकाची उपस्थिती व सादरीकरण यावर परीक्षक लक्ष केंद्रित करतील.
उत्कृष्ट भजनी धारकरी स्पर्धा: भक्तीभाव, गायन, वादनातील कौशल्य आणि सादरीकरणाच्या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल.
गणपती विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक वेशभूषा स्पर्धा: मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेला विशेष प्राधान्य दिले जाईल. वेशभूषेतील पारंपरिकता, सादरीकरण आणि एकूण आकर्षणकता या निकषांवर ही स्पर्धा आधारित असेल.
विशेष सत्कार: गणेशोत्सवादरम्यान वाडीतील भजनी बुवा व पखवाज वादक यांचा विशेष सत्कार मंडळातर्फे करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम व बक्षिसे:
प्रत्येक स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येणार असून, प्रत्येक विजेत्याला सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येईल. या आनंद सोहळ्यात वाडीतील सर्व नागरिकांनी व स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भाग्योधय विकास मंडळ, मुटाट (प्रभूवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.











