LIVE UPDATES

राखी सैनिकांच्या मनगटावर,राष्ट्रभक्ती प्रत्येकाच्या हृदयात

सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांचा लेख
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 30, 2026 12:04 PM
views 84  views
#kokansadlive#news update#konkan update#

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह, प्रेम आणि विश्वासाची घट्ट वीण जपणारा सण आहे. मात्र, या नात्यासाठी केवळ रक्ताचे नाते असण्याची मुळीच गरज नसते. देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणारे आपले शूरवीर हे या देशातील प्रत्येक बहिणीचे भाऊच आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाकडे आपण एका व्यापक आणि वेगळ्या विचाराने पाहिले पाहिजे.

गोव्यातील चैतन्य प्रतिष्ठान ही राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रशक्तीचा अंगार फुलवणारी, समाजमनात राष्ट्रभावनेची जाणीव जागवणारी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष केरळ व तामिळनाडूचे राज्यपाल मा. राजेंद्रजी आर्लेकर आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी सौ. अनघा आर्लेकर-देशपांडे गोव्यात संस्कारक्षम शिक्षण देणारी शाळाही चालवतात.या आर्लेकर दांपत्याने चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून गेल्या बारा वर्षांपासून एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी उपक्रम सुरू ठेवला आहे—‘एक राखी सैनिकांसाठी!’

गोव्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी स्वतःच्या हाताने राख्या तयार करतात. त्यानंतर एका शानदार सोहळ्याचे आयोजन करून या राख्या एकत्रित केल्या जातात आणि देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सैनिक बंधूंना पाठवल्या जातात. राष्ट्ररक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या हृद्य सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे. यावर्षीही मा. राजेंद्रजी आर्लेकर सरांनी मला या कार्यक्रमाचे आवर्जून निमंत्रण पाठवले. आमच्या अटल प्रतिष्ठानचे कायम निमंत्रित सदस्य आणि युवा सामाजिक कार्यकर्ते बाबा टोपले यांना सोबत घेऊन मी लोकभवन, दोनापावला, पणजी येथे पोहोचलो.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख वक्ते होते सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि नवनिर्वाचित मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. योगेशजी सोमण. योगेश सोमण यांच्याशी जोडला जाणारा आणखी एक आत्मीय दुवा म्हणजे अभिनेता असलेला माझा छोटा जावई श्री. भूषण महल्ले हा त्यांचा शिष्य आहे.

कार्यक्रमाचे औचित्य साधून सोमण सरांनी देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मा. मनोहरभाई पर्रिकर यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. त्यामुळे त्यांच्या संबोधनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीतून सोमण सरांनी उपस्थितांच्या मनात प्रखर राष्ट्रवादाची भावना जागवली.

सोमण सरांना ‘सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात संरक्षणमंत्र्यांची भूमिका साकारण्याची ऑफर आली होती. यामागचे प्रमुख कारण म्हणजे ते मा. मनोहरभाई पर्रिकर यांच्यासारखे दिसतात. दिसण्यात साधर्म्य असण्याबरोबरच विचारांमध्येही साम्य असल्यामुळे ही भूमिका त्यांच्यासाठी विशेष ठरली. या भूमिकेत त्यांचे केवळ सहा-सात संवाद असले, तरी त्यांच्या अभिनयप्रवासातील ही एक सर्वोत्कृष्ट आणि संस्मरणीय भूमिका ठरली.

सोमण सरांनी कार्यक्रमाशी पूर्णपणे सुसंगत असे प्रभावी संबोधन केल्यामुळे संपूर्ण सोहळा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. राखीच्या धाग्याचे एक टोक सैनिकांच्या मनगटाशी जोडलेले आहे, तर दुसरे टोक प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाच्या मनगटाशी जोडलेले आहे, याचा पुरेपूर विश्वास देणारा हा कार्यक्रम होता.

चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गोव्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल सत्त्याऐंशी हजार राख्या आणल्या होत्या. या राख्या मा. राजेंद्रजी आर्लेकर सरांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी सौ. अनघा राजेंद्र आर्लेकर-देशपांडे, गोव्याचे मा. राज्यपाल श्री. पुसापती गजपती राजू तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

निवेदकाच्या उत्कृष्ट निवेदनशैलीमुळे संपूर्ण कार्यक्रम आखीव-रेखीव आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.रक्षाबंधनाच्या पवित्र धाग्याला राष्ट्रकर्तव्याची जोड देणारा, आपल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवणारा ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने राखी पौर्णिमेला एक व्यापक आणि राष्ट्रभक्तीपूर्ण अर्थ प्राप्त करून देतो.ही केवळ राखी नाही, तर सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या मनगटाशी आणि प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणाशी जोडलेला राष्ट्रभक्तीचा धागा आहे.