
सावंतवाडी : सांगेली सावरवाड येथील भरारी महिला ग्रामसंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ मोहन दहिकर यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत यावर ठोस कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
गावात अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. काही पुरुषांचा अकाली मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप महिलांनी केला आहे. उलटपक्षी, तक्रार करणाऱ्यांनाच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असून एका तरुणाने याविरोधात आवाज उठवला असता त्याला मारहाण करून पोलिसांकडूनच दमदाटी करण्यात आल्याची कैफियत महिलांनी मांडली.
या पार्श्वभूमीवर कलंबिस्त पंचक्रोशीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कायमस्वरूपी बीट अंमलदारासह पोलीस चौकी सुरू करावी, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत आणि दारू विक्री करून दहशत माजवणाऱ्यांवर तडीपाराची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामसंघाच्या अध्यक्षा सुप्रिया पंढरीनाथ मडगावकर आणि सरपंच देवयानी पवार यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात सविता ठाकूर, लक्ष्मी गावडे, धनश्री पवार, सुनीता लाड, मानसी पवार, सुवासिनी न्हावी व स्नेहा कुडतरकर यांचा समावेश होता. तक्रारदारांना पोलीस संरक्षण मिळावे आणि संपूर्ण पंचक्रोशी पूर्णपणे दारूमुक्त करावी, अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.











