LIVE UPDATES

Sindhudurg to Navi Mumbai Flight Service : आकाशझेप !

विशेष संपादकीय
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 12:51 PM
views 124  views
Sindhudurg to Navi Mumbai flight service launched following the efforts of Maharashtra Guardian Minister Nitesh Rane to improve air connectivity in Konkan.

सिंधुदुर्ग : आपल्या माणसांबद्दल, आपल्या मातीबद्दल थोडीही आत्मीयता नसेल, तर मोठमोठ्या प्रकल्पांना कसा खो बसतो, याची अनेक उदाहरणे आमच्या कोकणाने या महाराष्ट्राला दिली आहेत. बेरोजगारी, पोटासाठी मुंबईला होणारे स्थलांतर, मूलभूत सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न गेली काही वर्षे ठप्प होते. मात्र, जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री नितेश राणे यांनी जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून अनेक चांगले बदल होताना दिसत आहेत. एका रात्रीत हा बदल होणार नाही; परंतु या बदलाला अत्यंत वेगाने आणि भक्कमपणे प्रारंभ झालेला आहे. याच ताजं उदाहरण म्हणजे सोमवारपासून मंत्री राणे यांच्या अथक प्रयत्नांतून सुरू झालेली सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा. यासाठी केंद्राकडून आवश्यक असलेली सर्व प्रकारची तांत्रिक प्रक्रिया महत्प्रयासाने पूर्ण करून त्यांनी अखेर प्रगतीची ही नवी उत्तुंग झेप घेतली आहे. 'हे राणेच करू शकतात,' असे कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही बोलले जाते, ते याच कार्यपद्धतीमुळे.

या विमानसेवेचा इतिहास पाहायचा, तर हे स्वप्न कोकणचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी सर्वप्रथम पाहिले. गोव्याच्या विमानतळावर असणारा जगभरातील प्रवासी आणि कार्गो सेवेचा ताण पाहता, सिंधुदुर्गात असे भव्य विमानतळ उभारून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यानंतरच्या घडामोडी सर्वांनाच ठाऊक आहेत. परंतु आज त्यांच्या विमानसेवेचे हे स्वप्न पूर्ण करत मंत्री नितेश राणे यांनी आपल्या राजकीय परंपरेचा, दिलेल्या शब्दाचा आणि पालकत्वाचा अत्यंत भक्कम दाखला दिला आहे.

हा विषय केवळ विमानसेवेपुरताच मर्यादित नाही. कोकणातून मुंबईला होणारे स्थलांतर कमी करणे, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे, या मिशनचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्णत्वास नेणे असेल, जलवाहतुकीचा आराखडा असेल किंवा जहाजबांधणीसारखा मोठा प्रकल्प असेल, हे सर्व या मिशनचेच पैलू आहेत आणि त्यावर पालकमंत्री अत्यंत गांभीर्याने लक्ष केंद्रित करून आहेत, हे स्पष्ट आहे.

विकासाचा बॅकलॉग भरून काढताना पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासोबतच आमदार दीपक केसरकर, आमदार प्रमोद जठार आणि आमदार निलेश राणे यांचे सहकार्यही तितकेच मोलाचे आहे. खरे तर राणे कुटुंबातील प्रत्येकानेच विकासात सातत्य राखण्याचा तळमळीने प्रयत्न केला आहे, तोही अगदी सत्तेत नसतानासुद्धा.

पालकमंत्री म्हणून नितेश राणे आपली जबाबदारी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडत आहेतच; परंतु आता खरी जबाबदारी आहे ती कोकणवासीयांवर. कोकणवासीयांनी आता आपली मानसिकता बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मराठीत एक म्हण आहे, 'देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला!' अशी आपली अवस्था आता होऊ नये. कोकणात मोठे प्रकल्प होत आहेत, दळणवळणाच्या आधुनिक सोयी उपलब्ध होत आहेत. याचा फायदा आपण करून घेण्याची गरज आहे.

कुठेतरी स्थानिक राजकारणात अडकून, डोक्यात राख घालून घेतली, तर या मोठ्या संधीला तुम्ही मुकणार आहात. मोठे प्रकल्प आणि त्यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा वापर आता कोकणवासीयांनी आपल्या कोकणचे चित्र बदलण्यासाठी करून घेतला पाहिजे. अशी संधी वारंवार मिळत नसते. हा कोट्यवधींचा निधी आणि विकास केवळ कोकणच्या भूमिपुत्रांसाठी आहे.

अत्यंत माफक दरात सुरू झालेल्या या विमानसेवेमुळे आज प्रवासाचा वेळ वाचणार आहे. उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात विचारांचे आणि नवनवीन संकल्पनांचे मोठ्या प्रमाणावर आदानप्रदान होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या या विकासाच्या झंझावाताला प्रत्येक कोकणवासीयाने आपल्या हृदयात जागा दिली पाहिजे. तरच तुमच्या मेंदूत आणि हातापायांत नवे बळ येईल आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नातला कोकण साकार होईल.

सागर चव्हाण

मुख्य संपादक, कोकणसाद मिडिया