LIVE UPDATES

साटेली-भेडशीचा सुपुत्र श्रेयस सावंत यांची सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती

Edited by: लवू परब
Published on: March 10, 2026 13:56 PM
views 568  views

दोडामार्ग : साटेली-भेडशी येथे वास्तव्यास असलेले तर मूळ परमे येथील सुपुत्र श्रेयस सखाराम सावंत यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी मिळवलेले हे यश परिसरासाठी अभिमानास्पद ठरले असून दोन्ही गावांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्रेयस सावंत यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साटेली-भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पहिली ते दहावीपर्यंत झाले. त्यानंतर सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेतून त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील पदवी शिक्षण त्यांनी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतले.

 पदवी शिक्षणानंतर श्रेयश यांनी भारतीय सैन्य दलाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी ही परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे.

श्रेयस सावंत यांचे वडील शेतकरी असून साध्या कुटुंबातून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे साटेली-भेडशी तसेच मूळ गाव परमे येथे आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.