"ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनी चालत नाही
त्यास मानव म्हणावे का ?"
ही काव्यपंक्ती एकोणिसाव्या शतकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेखणीतून साकारली. खरे तर, सावित्रीबाई हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका एवढीच त्यांची ओळख सर्वार्थाने अपूर्ण आहे. अध्यापनाबरोबरच साहित्यलेखन, साहित्य संपादन आणि समाजसेवेचे अखंड कार्य त्यांनी केले. गृहिणी, लेखिका, कवयित्री, संपादिका, नि: स्वार्थी समाजसेविका ही त्यांची खरी ओळख आहे. सावित्रीबाईंचे 'काव्यफुले', 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे काव्यसंग्रह सुपरिचित आहेत. 'जोतिबांची भाषणे' या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. सावित्रीबाईंच्या कविता निसर्गाचे गुणगान करणाऱ्या आहेत. समाजाचे आत्मभान जागविणाऱ्या प्रबोधनात्मक आहेत. काही कविता ऐतिहासिक, काही आध्यात्मिक आहेत.
शिक्षणाने माणूस बहुश्रुत होतो, व्यासंगी होतो, विवेकी होतो. हे सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्व दाखवून देते. पतीने हाती दिलेली पाटी-लेखणी स्वीकारली नसती तर किड्यामुंग्यांसारखे त्यांचे जीवन झाले असते. परंतु, त्यांनी संधीचे सोने केले.
सावित्रीबाईंचा प्रवास निश्चितच सोपा नाही. फार खडतर आहे. पावलापावलावर जीवनमरणाचा धोका होता. शाळेत जाताना माणसे तोंडावर शिव्या देत, दगड मारत, शेणाचे गोळे मारत. तेव्हा या अध्यापिकेला आपले पाऊल मागे घ्यावे असे वाटले नसेल का? कुणासाठी एवढा संघर्ष ही स्त्री करीत असावी? बरे, शासनाकडून तिला वेतन मिळत होते, असे म्हणावे किंवा पालकांकडून शिकवणी मिळत होती, असे म्हणावे तर तसेही नाही. विनावेतन स्त्री शिक्षणासाठी वेळ व्यतीत करणे, अपमान सोसणे यासाठी फार मोठे आत्मिक बळ लागते. ते या माउलीपाशी होते. असे प्रस्थापितांच्या विरोधात जाणे जर सोपे असते तर आपणही अयोग्य गोष्टींविरुद्ध पाऊल उचलण्याचे धाडस दाखविले असते, नाही का? पण आपल्याकडून ते होत नाही. कारण, लोक काय म्हणतील?, समाजाचा विरोध का झेलायचा? त्यापेक्षा अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वतःभोवती विणलेल्या 'आपण भले-आपले भले' या चाकोरीत मश्गूल राहण्यातच आमचा आनंद आहे. म्हणूनच, सावित्रीबाईंनी जोतिरावांना साथ देऊन सुरू केलेल्या शाळांमध्ये केलेले अध्यापन असो, अनिष्ट प्रथांविरोधात चाललेली लेखणी असो, विधवा स्त्रियांसाठी चालविलेले बालहत्याप्रतिबंधक गृह असो, स्त्रियांच्या केशवपनाविरोधात चालविलेला लढा असो, सतीप्रथेविरोधातील टीका असो, विधवा पुनर्विवाहासाठी चालविलेली चळवळ असो.. सावित्रीबाईचे कार्य धाडसी आणि अभिमानास्पद आहे. विशेष म्हणजे सावित्रीबाईचे महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीवर प्रचंड उपकार आहेत. एकोणिसाव्या शतकातील स्त्री, मग ती कोणत्याही जातीतील असो, तिला केशवपन, विधवा जीवनात कामुक वासनेचे बळी जाणे, शिक्षणाचा नाकारलेला अधिकार अशा दुःखद समस्यांना तोंड दाबुन सहन करावे लागत होते. या समस्यांविरोधात सावित्रीबाई ढालीसारख्या प्रस्थापितांविरोधात उभ्या राहिल्या.
त्या शतकातील इतर सर्वसामान्य मुलीप्रमाणेच सावित्रीबाईचे बालपण होते. सातारा जिल्ह्यातील नायगाव हे त्यांचे माहेर. ३ जानेवारी,१८३१ ला त्यांचा जन्म झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या नवव्या वर्षी पुण्यातील १४ वर्षीय जोतिरावांशी विवाह झाल्यावर त्यांचे जीवन विद्याज्योतीने उजळून निघाले. ही ज्योत स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सावित्रीबाईंनी स्वत: अनंत विद्याज्योती उजळवल्या. शतक- दीड शतकाच्या प्रवासानंतर आजही त्या ज्योतींचा प्रकाश या समाजात तेवताना दिसत आहे. त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिल्या शाळा सुरू केल्या. बालविवाहाविरुद्धही मोहीम चालवली. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला. त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी घर उघडले.
सावित्रीबाईंनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. सगळ्यांचा विरोध असूनही स्वतः शिकण्याची आस बाळगली. इतर स्त्रियांना शिकविले. व्रतापासून किंचितही ढळल्या नाहीत. कौतुक तर त्यांच्या खूप साऱ्या गोष्टींचे वाटते. त्यातही शिकवण्यासाठी असणारा प्रचंड विरोध, शारीरिक छळ त्यांनी सोसला. स्त्री उध्दारासाठी त्या झटल्या. हा इतिहास सर्वपरिचित आहे.
आजही समाजात चाकोरीबाहेरची कोणतीही गोष्ट करण्यास मन धजावत नाही. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी कुरवाळणाऱ्यांचेच कौतुक होते. मग ती कितीही चुकीची गोष्ट असो! पण कोणतीही योग्य कृती परंपरेच्या उलट जाऊन केली तर हा तुलनेने सुशिक्षित समाज टोकाची नावे ठेवत असतो. आजचा काळ जर असा असेल, तर सावित्री माउलीचा काळ किती भयानक असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी, नाही का! समाजातील बहुजन माणसाचे दुखणे पाहून ही माउली हळहळली. समाजाचा रोष पत्करावा लागू नये म्हणून मला काय त्याचे? असे म्हणून स्वस्थ बसली नाही. त्यामुळेच समाजमन ढवळून निघाले. स्त्रीला शिक्षणाची दारे खुली झाली. ही फार मोठी क्रांती आहे.
या आधुनिक शतकात अफगाणिस्तानसारख्या देशात स्त्री शिक्षणावर तेथील राजवटीने बंदी घातली आहे. तिथल्या स्त्रियांच्या व्यथा काय असतील ? हे उदाहरण समोर आले की आपला भुतकाळही कधीतरी असाच होता, हे वास्तव अधोरेखित होते. ते बदलण्याचे धाडस एका स्त्रीने केले. त्याची गोड फळे आज अपवाद वगळता समस्त स्त्री वर्ग चाखत आहे. आज शिक्षण हा स्त्रीचा मुलभूत हक्क आहे.
मला आठवतं, आमचे शिक्षक आम्हाला म्हणाले होते- जगातील सर्व १०० टक्के माणसांपैकी ३ टक्के माणसे अशी असतात, जी इतिहास घडवतात. उर्वरीत 97 टक्के माणसे अशी असतात, जी त्यांनी घडविलेला इतिहास वाचण्याचे काम करतात. आमच्या प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले या समाजातील वरील ३ टक्केपैकी होत्या. त्यांनी इतिहास घडवला. या महाराष्ट्रात सावित्रीबाई जन्मल्या म्हणून आज आम्ही साक्षर आहोत.
आम्हां स्त्रियांच्या साक्षरतेत त्यांचे अनमोल योगदान आहे. आज उच्चपदस्थ असणाऱ्या भारतीय स्त्रीची उध्दारकर्ती सावित्री माउली आहे. आमच्यासाठी प्रवाहाविरोधात जाण्याचे अतुलनीय धाडस त्यांनी केले. प्रसंगी विधवा स्त्रियांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली. प्लेगच्या साथीत स्वत: जनसेवा केली. त्यावेळच्या प्लेगची स्थिती कोरोनापेक्षाही भयंकर होती. इतिहासाची पाने सांगतात, सकाळी काखेत गाठ आली की संध्याकाळी तापाने फणफणून माणसे पटापट मरत. वैद्यकीय उपचार अपुरे होते. संसर्गाचा वेग अधिक असे. त्यावेळी ही माऊली गांजलेल्यांची सुश्रुषा करीत होती. प्लेगच्या साथीत होरपळलेल्या माणसांची सेवा करताना सावित्रीबाई अनंतात विलीन झाल्या.
दि. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या प्रगाढ कार्याच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नामकरण 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे करण्यात आले.
संत तुकाराम म्हणतात,
'' जे का रंजले गांजले
त्यासि म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा
देव तेथेचि जाणावा !"
म्हणूनच, आमच्या प्रेरणास्थान सावित्रीबाई आहेत. आम्हाला या देवतुल्य व्यक्तिमत्वाचा अभिमान आहे.
- सौ. मंगल नाईक-जोशी