LIVE UPDATES

सुधारित भात लागवड पद्धतीच शेतकऱ्यांना किफायतशीर

Edited by: रवींद्र जाधव
Published on: July 03, 2025 20:52 PM
views 57  views

कृषिसंवाद

सावंतवाडी : कोकणात भात शेतीचा विचार केला, तर पारंपरिक भात शेती आजही सुरू आहे. या पद्धतीत शेतकरी बैलांचा वापर करून नांगराच्या सहाय्याने भातशेती करतात. लागवडीसाठी बियाणे देखील स्थानिक म्हणजे वालय, पाटनी,  बेळा, खारा मुनगा, जिरगा यांसारख्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. यामुळे मिळणारे उत्पादन जरी कमी असले तरी त्यापासून आपल्या घरामध्ये पुरेल इतके अन्न, पुढील वर्षाला लागणारे बियाणे व शिल्लक राहिलेल्या गवतापासून जनावरांना सुका चारा मिळायचा. 

आता भात शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाला असून फायदेशीर भातशेती केली जाते. कृषी विभागाकडून यात सुधारित पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. 

या सुधारित पद्धतीत १. भात लागवडीची श्री पद्धत, २. सगुणा भात लागवडीची पद्धत म्हणजेच एस आर टी भात लागवड, ३ चार सूत्री भात लागवड. या पद्धतींमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकातील एकूण उत्पन्नामध्ये वाढ होत आहे.  

१. श्री पद्धतीने भात लागवड

या पद्धतीला ‘श्री’ हे नाव एस. आर. आय. याला इंग्रजीमध्ये ‘सिस्टीम ऑफ राईस इन्सेंटिफिकेशन’ यावरून पडले आहे. ही पद्धत मदागास्कर या देशातील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या लागवड पद्धतीमध्ये लागणारे बियाणे हे कमी लागते. बियाण्याची पेरणी ही गादी वाफ्यावर केल्यावर भात रोप १२ ते १५ दिवसांच्या व दोन ते तीन पानावर असताना रोपे मुळासकट काढून त्याची लावणी शेतामध्ये केली जाते. ही लावणी करताना सुयोग्य अंतरामध्ये म्हणजेच कमीत कमी २५ बाय २५ सेंटिमीटर अंतरावर लागवड केली जाते. जास्तीत जास्त हे अंतर ३० ते ४० सेंटीमीटरपर्यंत ठेवता येते. रोपांची लावणी केल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा कोनोविडर (भात कोळपे)च्या सहाय्याने उभी-आडवी कोळपणी तीन टप्प्यात करावी. कोळपणी केल्याने भात रोपाला अधिक फुटवे येऊन त्यातून अधिकचे उत्पन्न मिळते. जितके फुटवे जास्त तितके उत्पन्न जास्त. कोकणात एका रोपापासून जवळपास २५ ते ३० फुटवे आलेले आढळतात. या पिकाला शिफारसीनुसार खताची मात्रा व कीड रोग उद्भवल्यास त्यावर औषध फवारणी वेळीच करून घ्यावी. त्यानंतर भाताची काढणी दाणे ८० टक्के तयार झाल्यावर करावी. या पद्धतीने उत्पादनात पारंपरिकपेक्षा जवळपास दुपटीने वाढ होते व पारंपरिक पद्धतीपेक्षा जवळपास निम्मा खर्च येतो.

२. चार सूत्री भात लागवड

भात लागवडीची चार सूत्री पद्धत प्राध्यापक डॉ. नारायण कृष्णा सावंत यांनी शोधून काढली. चार सूत्रीमध्ये पहिले सूत्र भाताच्या तुसाची राख सिलिकॉन व पोटॅश घटकाच्या पूर्ततेसाठी रोपाच्या वाफ्यामध्ये मिसळली जाते. दुसऱ्या सूत्रात चिखलीच्या वेळी ग्लिरीसीडीयाचा पाला व भाताचा पेंढा जमिनीत मिसळला जातो. तसेच तिसऱ्या टप्प्यात भाताची लावणी पंधरा बाय वीस सेंटीमीटर किंवा वीस बाय वीस सेंटीमीटर किंवा २५ बाय १५ सेंटीमीटर अशी नियंत्रित चौकटीच्या पद्धतीने लावणी केली जाते. लावणी केल्यावर चार रोपांच्या चौकटीमध्ये युरिया व डीएपी खतापासून खास तयार केलेल्या विक्रम दोन  (युरिया ब्रिकेट)च्या गोळ्या टोचल्या जातात. भात पिकाची लावणी झाल्यावर त्या वाफ्यात फिरून नंतर या गोळ्या जमिनीत खेचायचे (टोचायचे) काम करावे लागते. लावणी झाल्यानंतर योग्य खत व रोग किडीपासून पिकाचे संरक्षण केल्यास उपयुक्त उत्पादन मिळण्यास मदत होते.

३. सगुणा भात लागवडीचे तंत्र (SRT)

सगुणा भात लागवडीचे तंत्र याचा शोध महाराष्ट्रातील कर्जत येथील कृषी पर्यटन केंद्र सगुणाबागेचे मालक, प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी लावला. यात पिकाची पेरणी गादीवाफ्यावर केली जाते. यासाठी लागणारे गादीवाफे हे खरीप हंगामात अगोदर किंवा रब्बी हंगामात केले जातात. गादीवाफ्यांचा  खालचा तळ एकशे पस्तीस सेंटीमीटर, उंची एक फूट व वरचा थर १२० सेंटीमीटर ठेवावा, तसेच लांबी ही उतारानुसार ठेवावी. दोन गादीवाफ्यांमध्ये एक फुटाचे अंतर सोडावे. गादीवाफ्यावर पेरणी करताना पेरणीसाठी विशिष्ट प्रकारचे साचे लागतात. या साच्यांमध्ये दोन रोपातील व दोन ओळीतील अंतर भात पिकासाठी २५ बाय २५ सेंटिमीटर इतके ठेवण्यात येते. तर कमी अंतराच्या म्हणजे कांदा, कुळीथ अशा रब्बी हंगामातील पिकांसाठी हे अंतर १० सेंटीमीटर ठेवण्यात येते. 

या वेगवेगळ्या प्रकारचे साचे आपण फॅब्रिकेशनमधून तयार करू शकतो. या साच्यांमध्ये पेरणीच्या वेळी एका वेळेसच बियाणे टोकले जाते. बियाणे टोकून झाल्यावर जमिनीतील छिद्रे भरून घेतली जातात. त्यानंतर जमिनीत ओलावा निर्माण झाल्यावर त्यावर ‘गोल’या उगवण पूर्व प्रकारातील तणनाशकाची फवारणी करण्यात येते. ही फवारणी केल्यामुळे जवळपास पुढील एक महिना नवीन तण उगवत नाही. भात रोपांची एक फुटापर्यंत वाढ होते व एक महिन्यानंतर या भाताच्या  चार रोपांच्यामध्ये एक चमचा सुफला खत जमिनीत गाळून दिल्याने पिकाला रासायनिक खताचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होतो. पिकाची काढणी कालावधी पूर्ण झाल्यावर त्यानंतर ग्लायफोसेट या तणनाशकाची फवारणी करता येते. यावेळी अजून तण आले तर ते मरून जातात व त्यापुढील आठ ते पंधरा दिवसानंतर पुन्हा नवीन पिकाची रब्बी हंगामात लागवड करता येते. या पद्धतीमध्ये जमिनीची एकदा मशागत केल्यानंतर पुन्हा मशागत करण्याची आवश्यकता नाही. भविष्यामध्ये जमिनीत खत न घालता देखील चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात थांबते.

पीक प्रात्यक्षिक व अनुदान

श्री पद्धतीने व एसआरटी पद्धतीने भात लागवड  पीक प्रात्यक्षिकासाठी कृषी विभागाकडून पीक प्रात्यक्षिक स्वरूपात बियाणे, खते, औषधे, कीटकनाशके आदी निविष्ठांचा पुरवठा करण्यात येतो. त्याद्वारे शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सुधारित तंत्राचा उपयोग करून आपल्या भात शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. कापणीनंतर सुधारित पद्धतीने लागवड केलेल्या भाताचे उत्पादन व पारंपरिक पद्धतीने केलेल्या भाताचे उत्पादन यामध्ये तुलना करून पीक प्रात्यक्षिकाचा फायदा व महत्त्व शेतकऱ्यांसमोर कृषी विभागातर्फे मांडले जाते.