
सावंतवाडी : शेतात कष्ट करणारा बळीराजा त्याने पिकवलेले धान्य त्याचे मोल समजावे, मातीशी अधिक घट्ट नाते व्हावे त्याची प्रत्यक्षरीत्या अनुभूती मिळावी; या उद्देशाने विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, शिरळ गुरुकुलने मार्गताम्हणे येथील सिद्धी संजय जाधव यांच्या शेतात भातलावणी उपक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी थेट शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने भातलावणी केली. काही विद्यार्थ्यांनी नांगर कसा धरतात याचा अनुभव घेतला. चिखलणी झाल्यावरती विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी भाताची रोपं लावत भात लावणी चा आनंद घेतला. श्री. संजयजी जाधव मुलांना मार्गदर्शन करत होते.जाधव कुटुंबियांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्या जाधव कुटुंबियांनी मुलांनी त्यांच्या कष्टामध्ये थोडा हातभार लावल्यामुळे आनंदाने मुलांचे कौतुक केले.
या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी त्याच पद्धतीने गुरुकुल शिक्षक गजानन गुणीजन,सुश्रुत चितळे, केतकी मुसळे, आदित्य तांबे, रोहन सिनकर उपस्थित होते. अशा पद्धतीने मुलांनी आनंदाने आणि उत्साहाने भात लावणी उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.