
वैभववाडी : खांबाळे येथे झालेल्या अपघातात सोनाळी येथील एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत. यात पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कणकवली व ओरोस येथे पाठविण्यात आले आहे. सोनाळी बौद्धवाडी येथील सुजल भोसले आपल्या घरातील ५ जणांना घेऊन रिक्षाने वैभववाडीहून फोंड्याच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान खांबाळे आदिष्टी मंदिरानजीक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी थेट रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली. यात गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. रिक्षातील सुशांत सिद्धार्थ भोसले (२६) ,स्नेहांश सुशांत भोसले (५), स्वप्नील योगेश भोसले (३०), सुजल सिद्धार्थ भोसले (३२), योगेश पांडुरंग भोसले (१७), सोजवी सिद्धार्थ भोसले (२९) ही सहाजण जखमी झाले आहेत. चालकासोबत पुढील भागात बसलेला स्नेहांश भोसले (वय ५ )हा गंभीर जखमी आहे. त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अपघातानंतर खांबाळे येथील तरुणांनी रिक्षात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. हे मदत कार्य खांबाळेचे माजी उपसरपंच गणेश पवार, अक्षय पवार, दिपक पवार, योगेश पवार, जयेश पवार आदी तरुणांनी केले.