LIVE UPDATES

Ramayana Movie 2026 : 'रामायण’....‘महाभारत’ घडवणार ?

आपल्‍याला हे माहिती आहे का ?
Edited by: स्‍वप्‍नील परब
Published on: October 30, 2026 06:19 PM
views 69  views
Ranbir Kapoor as Lord Ram in Nitesh Tiwari's upcoming Ramayana Part One movie.

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आता प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. तब्बल ५० हजारांहून अधिक स्क्रीनवर जागतिक स्तरावर चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू असून, आगाऊ बुकिंगमध्येही चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. ‘रामायण : पार्ट वन’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी मोठी रणनीती आखली आहे. परदेशात ५० हजारांहून अधिक स्क्रीनवर चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे वृत्त आहे.

विशेष म्हणजे, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या २९ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, भारतात ब्लॉक केलेल्या सीट्ससह आगाऊ बुकिंगमधून तब्बल १६ कोटी ३१ लाख रुपयांची ग्रॉस कमाई झाली आहे. तर ब्लॉक सीट्स वगळता हा आकडा १३ कोटी ४८ लाख रुपयांवर पोहोचला आहे.

या भव्य चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सनी देओल हनुमानाच्या, रवी दुबे लक्ष्मणाच्या आणि आदिनाथ कोठारे भरताच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.

अरुण गोविल राजा दशरथांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या बजेटची चर्चा असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आता या भव्य रामायणाला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद