
सिंधुदुर्गनगरी/लवू म्हाडेश्वर: निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेला, विस्तीर्ण समुद्रकिनारा, हिरवीगार वनराई, ऐतिहासिक किल्ले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठी क्षमता बाळगून आहे. मात्र, या नैसर्गिक संपत्तीला नियोजनबद्ध विकासाची जोड मिळाली, तर सिंधुदुर्गही देशातील विकसित पर्यटन जिल्ह्यांच्या पंक्तीत जाऊन बसू शकतो. याची प्रचिती भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील दमणला भेट दिल्यानंतर आली. लोकप्रतिनिधींचे प्रयत्न, प्रशासनाची कार्यक्षमता आणि नागरिकांची सकारात्मक साथ यांच्या बळावर दमणने विकासाचे वेगळे उदाहरण उभे केले आहे. हाच अनुभव सिंधुदुर्गसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सिंधुदुर्गनगरीतील पत्रकारांसाठी दमण येथे दोन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात दमणमधील पर्यटन विकास, जिल्हा पंचायतीचे उपक्रम, नगरपरिषदेचे नियोजन, ग्रामपंचायतींचे कामकाज आणि सार्वजनिक सुविधांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. दमणमध्ये फिरताना स्वच्छता, रस्त्यांची आखणी, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण आणि नागरी व्यवस्थापन यांचा एकत्रित परिणाम प्रकर्षाने जाणवला. या छोट्या जिल्ह्याने आपल्या मर्यादित भौगोलिक क्षेत्रात विकासाचे जे चित्र उभे केले आहे, त्यातून सिंधुदुर्गसाठी अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
छोटा प्रदेश; मात्र विकासाचे मोठे उदाहरण!
दमण हा गुजरातच्या दक्षिणेला आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. आकाराने लहान असलेल्या या जिल्ह्याची भौगोलिक रचना दमणगंगा नदीमुळे दोन भागांत विभागली गेली आहे. उत्तरेकडील भाग नानी दमण, तर दक्षिणेकडील भाग मोठी दमण म्हणून ओळखला जातो. मोठ्या दमणमध्ये ऐतिहासिक दमण किल्ला आणि प्रशासकीय कार्यालयांचा परिसर आहे. पोर्तुगीज राजवटीचा ऐतिहासिक वारसा जपतानाच आधुनिक नागरी सुविधांची उभारणी करण्याचा प्रयत्न येथे दिसून येतो.
१९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज राजवटीचा अंत झाला. मात्र, त्यांनी उभारलेल्या ऐतिहासिक वास्तू आजही दमणच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहेत. १५८१ मध्ये स्थापन झालेल्या दमण नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत आजही इतिहासाच्या खुणा जपल्या गेल्या आहेत. जुन्या वास्तूंचे जतन आणि आधुनिक गरजांनुसार त्यांचे नूतनीकरण यांचा समन्वय येथे पाहायला मिळतो.
रस्ते, स्वच्छता आणि सुशोभीकरणातून बदललेले शहर
दमणमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात ते रुंद आणि सुबक रस्ते. अनेक ठिकाणी चारपदरी रस्ते, दोन्ही बाजूंना बंदिस्त गटारे, रुंद पदपथ आणि पदपथांच्या कडेला लावलेली आकर्षक झाडे दिसतात. रस्त्यांवरील कठडे, दमणगंगा नदीवरील पूल आणि सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण यामध्येही रंगसंगती व नियोजनाची काळजी घेतलेली दिसते.
विशेष म्हणजे, शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न येथे दिसतो. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्ताव्यस्त केबल्स, लोंबकळणाऱ्या तारा किंवा जागोजागी लावलेले मोठे जाहिरात फलक सहजपणे नजरेस पडत नाहीत. नाईट मार्केटची आकर्षक विद्युत रोषणाई, दुकानांच्या दर्शनी भागाचे नियोजन आणि पर्यटकांसाठी उभारलेल्या बसण्याच्या सुविधा यामुळे बाजारपेठांनाही स्वतंत्र सौंदर्य प्राप्त झाले आहे.
समुद्रकिनारे असोत, बाजारपेठा असोत किंवा अन्य सार्वजनिक जागा, पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक आणि मजबूत बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी कार्यालये आणि पोलीस ठाण्यांच्या इमारतींमध्येही नीटनेटकेपणा जाणवतो. पर्यटनाचा विकास केवळ समुद्रकिनारे सुंदर करण्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहराचे नियोजन महत्त्वाचे असते, याची जाणीव दमणमध्ये होते.
पारदर्शक कारभाराची प्रचिती
दमणच्या विकासामागील प्रशासकीय कार्यपद्धती समजून घेण्यासाठी पत्रकारांनी दमण नगरपरिषदेला भेट दिली. तेथील सहकारी अधिकारी रश्मी दुबे आणि अधीक्षक आनंद नायर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती दिली.
पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक इमारतीत आजही नगरपरिषदेचे कामकाज सुरू आहे. इमारतीचे नूतनीकरण सुरू असतानाही तिचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९१५ सालच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या खुर्च्या आजही जतन करण्यात आल्या असून, त्यांचा वापरही केला जात असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनांना बंद दरवाजांऐवजी काचेच्या भिंतींचा वापर केल्याचे दिसले. कामकाजात सहजता आणि पारदर्शकता राखण्याच्या दृष्टिकोनातून ही रचना लक्षवेधी आहे. लोकांची कामे व्हावीत आणि नागरिक समाधानी राहावेत, हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे रश्मी दुबे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिल्यास विकासकामांना गती मिळू शकते, हा संदेश त्यांच्या संवादातून मिळाला.
दमणच्या विकासात प्रशासकीय नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत दमणच्या पायाभूत सुविधा आणि नागरी व्यवस्थापनात बदल झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

कचरा व्यवस्थापनासाठी एकत्रित यंत्रणा
दमण जिल्ह्यातील स्वच्छतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कचरा संकलनासाठी करण्यात आलेली व्यवस्था. दमण जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष धरम पटेल यांची भेट घेऊन पत्रकारांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती घेतली.
संपूर्ण जिल्हा स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी एका स्वतंत्र एजन्सीकडे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एकाच समन्वित यंत्रणेमार्फत स्वच्छतेची कामे केल्यामुळे विविध भागांत एकसमान व्यवस्था राखण्यास मदत होते. जिल्हा पंचायतीच्या इतर उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दमणमध्ये स्वच्छता ही केवळ एखाद्या विशेष मोहिमेपुरती मर्यादित नसून ती दैनंदिन व्यवस्थेचा भाग असल्याचे जाणवते. सिंधुदुर्गमध्येही ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून अशा प्रकारची एकात्मिक व्यवस्था उभारता येऊ शकते.
रिंगणवाडा ग्रामपंचायतही विकासाचा आदर्श
दमणच्या विकासाचा अभ्यास करताना पत्रकारांनी रिंगणवाडा ग्रामपंचायतीला भेट दिली. ग्रामपंचायतीची प्रशस्त आणि सुबक इमारत, नियोजनबद्ध परिसर आणि गावातील सुविधांनी लक्ष वेधून घेतले. तेथील ग्रामपंचायत सचिव पियुष पटेल यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती दिली.
सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सरपंचांसह आठ ग्रामपंचायत सदस्य कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या इमारतींच्या बांधकामात एकसमान रचना आणि सुविधांचा विचार करण्यात आल्याचे दिसले.
गावातील पहिली ते दहावीपर्यंतची शाळा प्रशस्त, आकर्षक आणि सुविधांनी सुसज्ज आहे. लहान मुलांसाठीची अंगणवाडी इमारतही चांगल्या पायाभूत सुविधांनी सज्ज असल्याचे दिसून आले. सरकारी शाळांमध्येही दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास पालकांचा विश्वास वाढतो, याचे हे उदाहरण म्हणता येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातही शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायत इमारतींचे नियोजनबद्ध आधुनिकीकरण करण्यासाठी या अनुभवाचा उपयोग होऊ शकतो.

पर्यटन विकासासोबत सुरक्षिततेलाही महत्त्व
दमणमध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. पर्यटकांचे स्वागत, बाजारपेठांची आकर्षक मांडणी आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल यामुळे पर्यटनाला पूरक वातावरण तयार होते. स्थानिकांकडून सुरक्षिततेबाबतही सकारात्मक अनुभव सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत नागरिक आणि पर्यटक सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात, असे निरीक्षण दौऱ्यात नोंदवण्यात आले.
पर्यटनाचा विकास करताना केवळ पर्यटकांची संख्या वाढवणे पुरेसे नसते. त्यासाठी सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पार्किंग, दिशादर्शक फलक आणि नागरिकांसाठीच्या सुविधा यांनाही समान महत्त्व द्यावे लागते. दमणमध्ये या बाबींचा एकत्रित विचार झाल्याचे दिसते.
‘युटिलिटी बॉक्स’मुळे शहराला टापटीपपणा : केबलच्या जाळ्यातून मुक्त शहराची संकल्पना
दमणमधील एक महत्त्वाची बाब म्हणजे भूमिगत केबल व्यवस्था. रस्त्यांच्या कडेला किंवा इमारतींवरून लोंबकळणाऱ्या केबल्स आणि विजेच्या तारा दिसत नाहीत. त्यासाठी भूमिगत वाहिन्या आणि युटिलिटी बॉक्सचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळाली.
सिमेंटचे युटिलिटी बॉक्स आणि बंदिस्त गटारांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून विविध सेवांच्या देखभालीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अस्ताव्यस्तपणा कमी होण्यास मदत होते. सिंधुदुर्गमधील प्रमुख शहरे, बाजारपेठा आणि पर्यटनस्थळांवरही अशा व्यवस्थेचा टप्प्याटप्प्याने विचार केल्यास शहरांचे रूप पालटू शकते.
सिंधुदुर्गकडे निसर्गसंपत्ती अधिक; गरज नियोजनाची!
दमण आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना समुद्रकिनाऱ्यांचा लाभ मिळाला आहे. मात्र, सिंधुदुर्गकडे निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, जैवविविधता, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाच्या असंख्य संधी आहेत. या संपत्तीचा शाश्वत आणि नियोजनबद्ध वापर केल्यास जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.
त्यासाठी पर्यटनस्थळांच्या परिसरात स्वच्छता राखणे, रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे, दिशादर्शक फलक उभारणे, पार्किंगची व्यवस्था करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, भूमिगत केबल व्यवस्थेचा विचार करणे आणि स्थानिक बाजारपेठा सुबक बनवणे आवश्यक आहे. ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करून गावागावांत विकासाचे समान निकष लागू करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
यासोबतच स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवसायाचे प्रशिक्षण, होमस्टे आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन, समुद्रकिनाऱ्यांचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि पर्यटन हंगामाबाहेरही पर्यटकांना आकर्षित करणारे उपक्रम राबवता येऊ शकतात.
इच्छाशक्ती, नियोजन आणि लोकसहभागाची गरज
दमणच्या दौऱ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली—विकासासाठी केवळ मोठ्या निधीची गरज नसते; उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, कामातील सातत्य, स्पष्ट जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागालाही तितकेच महत्त्व असते. लोकप्रतिनिधींनी विकासाची दिशा निश्चित करावी, प्रशासनाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि नागरिकांनी स्वच्छता व सार्वजनिक मालमत्तेच्या जतनात सक्रिय सहभाग घ्यावा, तर परिवर्तन घडू शकते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आयोजित या अभ्यास दौऱ्याने सिंधुदुर्गच्या विकासासाठी नवी दृष्टी दिली आहे. दमणची हुबेहूब नक्कल करणे हा उद्देश नसून, तेथील चांगल्या संकल्पना सिंधुदुर्गच्या भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार राबवणे अधिक महत्त्वाचे ठरेल.
निसर्गाने सिंधुदुर्गला भरभरून दिले आहे. आता या निसर्गसंपत्तीला आधुनिक सुविधा, स्वच्छता, सक्षम प्रशासन आणि दूरदृष्टीची जोड देण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधींचे प्रयत्न, प्रशासनाची मेहनत आणि जनतेची साथ एकत्र आली, तर ‘दमणसारखा विकसित सिंधुदुर्ग’ हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








