
सावंतवाडी : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वेत्ये खांबलवाडी येथील गोराकुंभार मंदिरासमोर सोमवारी सकाळच्या सुमारास दुचाकींचा भीषण अपघात झाला. पुढील जुपिटर स्वाराने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या रॉयल एनफिल्डची धडक बसून झालेल्या या अपघातात एका २६ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
शोभा फर्नांडिस (वय २६, रा. मडगाव गोवा) असे अपघातात मृत पावलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी जुपिटर चालक प्रदीप रामचंद्र वेंगुर्लेकर (वय ३७, रा. सातोसे लिंगेवाडी, ता. सावंतवाडी) याच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी डेनसन उर्फ डोनाल्ड लिबर्टस डीनिस (वय २७, रा. कुंकळी, साऊथ गोवा) हे आपली मैत्रीण शोभा फर्नांडिस हिच्यासह रॉयल एनफिल्ड वरून गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. सकाळी ९ च्या सुमारास वेत्ये खांबलवाडी येथील गोराकुंभार मंदिरासमोर पुढील जुपिटर चालक प्रदीप वेंगुर्लेकर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व हयगयीने आपल्या ताब्यातील जुपिटर गाडीचा (MH 07 AM 8155) अचानक ब्रेक दाबला.
यामुळे पाठीमागून येणाऱ्या डेनसन यांनीही गाडी वाचवण्यासाठी ब्रेक लावला, मात्र त्यांची रॉयल एनफिल्ड जुपिटरवर जाऊन आदळली. या जोरदार धडकेत एनफिल्डच्या मागे बसलेली शोभा फर्नांडिस ही रस्त्याच्या उजव्या बाजूने रस्त्यावर फरफटत जाऊन मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरच्या लोखंडी गार्डवर जाऊन आदळली. यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात फिर्यादी डेनसन यांच्यासह जुपिटरच्या मागे बसलेले साक्षीदार दिगंबर मोहन सावंत हेही जखमी झाले असून दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर जखमींवर सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर प्रदीप वेंगुर्लेकर यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले. या घटनेची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.










