
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या मच्छीमार्केट परिसरात बसवण्यात आलेल्या कचरा विल्हेवाट (Waste Disposal) मशीनमुळे होणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याप्रकरणी नागरिकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. आगामी गणेश चतुर्थीचा सण तोंडावर असताना या दुर्गंधीचा नागरिक व व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मच्छी मार्केट परिसरातील स्थायी रहिवाशांनी दिलेल्या या निवेदनावर तब्बल १९७ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करताना कृष्णा केसरकर, जयसिंग शरबिद्रे, जितेंद्र सावंत, सागर माळकर, एकनाथ माळकर, अनिल शरबिद्रे, सुहास पिळणकर, गणपत परब, भरत आकेरकर, विपुल करलकर, केतन वर्दम, मंगेश शेळटे, हुजफा खुल्ली व नागरिक उपस्थित होते.
या निवेदनानुसार, कचरा विल्हेवाट लावणारी ही मशीन दाट लोकवस्तीच्या भागात बसवण्यात आल्यामुळे खालील गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मशीनमधून सातत्याने पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याला श्वसनाचा धोका निर्माण झाला आहे. माशा, डास आणि इतर रोगराई पसरण्याची भीती वाढली असून परिसराचे नैसर्गिक पर्यावरण व स्वच्छता बिघडली आहे.
मच्छी मार्केटमधील विक्रेते आणि खरेदीसाठी येणारे ग्राहक यांना या दुर्गंधीचा नाहक त्रास होत आहे. परिसरातील मटन, चिकन विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असले, तरी ही मशीन दाट लोकवस्तीत न बसवता गावाबाहेर निर्जन व मोकळ्या जागेत स्थलांतरित करावी, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे. यावर प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा आणि येत्या आठ दिवसांत सदर मशीन वस्तीच्या परिसरातून न हटवल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर कचरा विघटनाचा हा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत.










