
स्पष्टवक्तेपणा, आक्रमक भूमिका आणि राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे नाव म्हणजे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे. सत्तेत असूनही सत्ताधाऱ्यांना सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. 'बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल' ही नारायण राणेंची छबी त्यांच्यात वेळोवेळी दिसते. आजपर्यंतची सर्व अधिवेशने त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी गाजवली आहेत. 'कोकणसाद लाईव्ह'च्या प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर ‘कोकणसाद’चे मुख्य संपादक सागर चव्हाण, मुख्य उपसंपादक जुईली पांगम यांनी घेतलेली स्फोटक मुलाखत.
प्रश्न : साहेब, तुमचा राजकीय प्रवास आम्ही खूप जवळून पाहिला आहे, तो अत्यंत खडतर होता. या खडतर प्रवासानंतर आमदार म्हणून तुमची जी ही नवी इनिंग सुरू झाली, ती आम्हा मराठी माणसांसाठी खूप अभिमानास्पद आहे. कोकणने नेहमीच राणे कुटुंबाला भरभरून दिलंय आणि तुम्हीही प्रत्येक भाषणात ते ऋण व्यक्त करत असता. आमदार झाल्यानंतर, आपल्या माणसांसाठी काम करताना मिळणारे जे समाधान असतं, ते आजच्या घडीला तुम्हाला मिळतंय का?
आमदार झाल्यानंतर 'समाधान' असा विषय नसतो. आपण पब्लिक सर्विस (लोकसेवा) मध्ये आहोत. लोकसेवेत कुठलीही गोष्ट एका जागी समाधानी होऊन थांबत नाही. काम झालं, लोकांनी आभार मानले इथपर्यंत ठीक आहे. पण समाधानी व्हायचं नसतं; आज एक काम झालं तर अजून अनेक कामं शिल्लक असतात. राजकारणात सगळीच कामं पूर्ण करणारा नेता मी तरी पाहिलेला नाही. माझ्या मतदारसंघाचा अनेक वर्षांचा जो बॅकलॉग आहे, तो भरून काढणं माझं टार्गेट आहे. सभागृह, मंत्रालय आणि विधानभवन हे त्याचे माध्यम आहे. २८८ आमदारांपैकी सरकार तुम्हालाच फंड का देईल? त्यासाठी सभागृहात ताकद दाखवावी लागते. देवाच्या कृपेने मला लोकसभेच्या ५ वर्षांच्या कार्यकाळाचा मोठा फायदा झाला. तिथले आणि इथले नियम सारखेच असल्याने काम करणे सोपे झाले. मला एका दिवसाचे समाधान नको आहे, समाधानात सातत्य पाहिजे. उर्वरित आयुष्य मला कोकणासाठी घालवायचे आहे, कारण राणे कुटुंबाला सिंधुदुर्गाने भरभरून दिले आहे. एकाच घरातून तीनही जण जनतेतून निवडून आलेत, असा दुसरा जिल्हा नाही. त्यामुळे आता २१ व्या शतकातील नियोजनबद्ध विकास आपल्याला करायचा आहे."
प्रश्न : तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात. पण अधिवेशनात ज्या पद्धतीने तुम्ही कोकणचे प्रश्न अगदी पोटतिडकीने मांडता, सरकारला प्रश्न विचारता, त्यासाठी मोठी हिंमत लागते. ही हिंमत नेमकी कुठून येते?
"ही हिंमत नाही, हे माझ्या मातीवरचं आणि जिल्ह्यावरचं प्रेम आहे! मी आदरणीय राणे साहेबांना या जिल्ह्यावर अफाट प्रेम करताना पाहिलंय. ते जगात कुठेही गेले तरी त्यांच्यासाठी पहिला 'सिंधुदुर्ग' असतो. मग मला ती जिद्द प्रेमातूनच मिळते. इतर जिल्ह्यांना जेव्हा निधी मिळतो, मग माझ्या जिल्ह्याने काय वाईट केलंय? आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचे मागतो आणि ते घेऊनच जाणार! मी कधीही हक्काच्या बाहेर काही मागत नाही, आणि जेव्हा प्रश्न मांडतो तेव्हा उपायही सांगतो. उदाहरणार्थ, नगरपंचायतींना आधी दीड-दोन कोटी मिळायचे. मी सभागृहात तुलना केली की, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, तिथे ७५ कोटी मिळतात तर माझ्या कुडाळ नगरपंचायतीला कमी का? आता तिथे साडेआठ कोटी मिळायला सुरुवात झाली आहे.
तसेच, NDRF च्या नुकसान भरपाईच्या निकषांचे मी अध्ययन केले. मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मिळतात, मग माझ्या कोकणातील शेतकऱ्याला साडेतीन ते चार हजारांवर का गुंडाळले जाते? नितेश (राणें) पालकमंत्री असताना आम्ही आवाज उठवला आणि तो निधी १२ हजारांच्या वर नेला. पण मी तिथेही समाधानी नाही, उर्वरित महाराष्ट्राला जे निकष आहेत, तेच कोकणाला मिळाले पाहिजेत आणि हा निकष मी बदलून आणणारच!"
प्रश्न : सर, ज्या सभागृहात नारायण राणे उभे राहिले की संपूर्ण सभागृह शांत व्हायचं, तेच वातावरण आज तुमच्या बाबतीतही दिसतं. पण अशा वेळी 'नारायण राणेंचा मुलगा' म्हणून तुमच्यावर काही तुलनात्मक प्रेशर (दबाव) असतो का? तो तुम्ही कसा हँडल करता?
"१००% प्रेशर असतो! लहानपणापासूनच तो दबाव माझ्यावर आहे. मधली १० वर्षं मी कुठल्याही पदावर नव्हतो. घरात साहेब केंद्रीय मंत्री होते, नितेश २०१४ ते २०२४ सतत आमदार आहे, घरात पद नसलेला मी एकटाच होतो तरीही आम्ही काम करत राहिलो. सभागृहात बोलताना प्रत्येक शब्द रेकॉर्ड होत असतो, त्यामुळे तिथे आपण चुकू शकत नाही, वायफळ बोलू शकत नाही. तिथे पॉईंट ऑफ ऑर्डर किंवा पॉईंट ऑफ प्रोसिजरचे मुद्दे उपस्थित होतात. जर आपण चुकलो तर ती आपली बदनामी आणि अपमान असतो. तो अपमान माझ्या वाट्याला येऊ नये म्हणून मी पूर्ण अभ्यास करून जातो.
मी साहेबांची जुनी भाषणं गॅलरीत बसून अभ्यासायचो. आज सभागृहात छगन भुजबळ, अजितदादा, स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यासारखी मातब्बर लोक समोर असतात, त्यांच्यासमोर बोलताना बारकाईने लक्ष द्यावे लागते.
भाषण करताना डोक्यात फक्त विषय असतो, समोर कोण कसं बघतंय याने फरक पडत नाही. साहेबांची लेगसी माझ्या पाठीशी आहे. देवाच्या कृपेने माझा फायनान्स (अर्थव्यवस्था) हा आवडीचा विषय आहे. स्वर्गीय प्रणब मुखर्जी देशाचे अर्थमंत्री असताना आम्ही तरुण खासदार होतो, तेव्हा ते आमचे बजेट समजून घेण्यासाठी क्लासेस घ्यायचे. मी चार्टर्ड अकाउंटंट्ससोबत बसून ऑडिट फाईल्स आणि इन्कम टॅक्स स्क्रुटनी अभ्यासतो.
पण शेवटी, आपण सभागृहात किती बोलतो यापेक्षा रिझल्ट (निकाल) किती देतो हे महत्त्वाचे आहे. मी अधिवेशनात गोहत्येचा विषय ३-४ वेळा मांडला. मुख्यमंत्र्यांनी रेकॉर्डवर 'मोक्का' लावू असं सांगितलं होतं, पण लागत नव्हता. मागच्या अधिवेशनात मी पुन्हा मुद्दा उचलला आणि आता अधिकृतपणे मोक्का लागला. यामुळे एक जरी गाय वाचली तरी तो माझ्यासाठी समाधानाचा आणि रिझल्ट देणारा विषय आहे. नुसती भाषणं करून कामात शून्य असणाऱ्यांची रिस्पेक्ट कमी होते."
प्रश्न : सिंधुदुर्गातील आरोग्याचा प्रश्न अत्यंत भीषण आहे, ८०% आपण गोव्यावर अवलंबून आहोत. तसेच दुसरा मोठा प्रश्न म्हणजे रोजगार. या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर तुमची भूमिका काय आहे? कारण अलीकडेच तुम्ही जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरून पोलीस प्रशासनाला धारेवर धरले होते, त्यावर तरुणांचे म्हणणे आहे की रोजगार नसल्यामुळे ते या मार्गाकडे वळतात. यावर तुमचे काय म्हणणे आहे?
ही महाराष्ट्र लेव्हलची पॉलिसी मेकिंग आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलचा विषय मी सभागृहात हसन मुश्रीफ यांच्यासमोर मांडला होता. मुळात त्यांनी राण्यांच्या मेडिकल कॉलेजच्या ईर्षेपोटी इथे सरकारी व्यवस्था आणली, पण ती डेव्हलप केली नाही. सिव्हिल हॉस्पिटलचा स्टाफ उचलून मेडिकल कॉलेजला दिला, ज्यामुळे दोन्ही व्यवस्था बिघडल्या. आमदार झाल्यानंतर मी बैठका घेतल्या, मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून आमच्या कॉलेजमधून फ्री ऑफ कॉस्ट स्टाफ दिला. फार्मसीचे साडेसहा कोटींचे बिल थकीत होते, ते आता दोन कोटींवर आणून औषधांची व्यवस्था सुरळीत केली. पालकमंत्रीही यात मेहनत घेत आहेत. येणाऱ्या काळात गोव्यापेक्षा कमी नाही, अशी आरोग्य व्यवस्था आपण उभी करू. कुठलीही इंडस्ट्री आणायची असेल तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर (पाणी आणि वीज) द्यावे लागते. आमच्या आजारी एमआयडीसीसाठी मी उद्योगमंत्र्यांकडून ९० कोटींचा फंड मंजूर करून आणला आहे. २४ तास वीज आणि पाणी असल्याशिवाय कुठला इन्व्हेस्टर इथे येईल? आपल्याला रिफायनरी सारखे प्रदूषण करणारे कारखाने नकोत. आपल्याला गारमेंट इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक युनिट्स किंवा सेमी-प्रोसेसिंग युनिट्स हवे आहेत.
कुडाळमध्ये ७० कोटींचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम उभे राहते आहे. अंतर्गत रस्त्यांसाठी २७ कोटींचे काम सुरू आहे. प्रदूषण विरहित छोटे छोटे युनिट्स तयार करून ८ ते १० हजार कुशल-अकुशल तरुण-तरुणींना रोजगार देण्याची आमची योजना आहे. इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झाले की कंपन्यांना 'सिंगल विंडो क्लीअरन्स' देऊन आम्ही इथे आणू.
रोजगार नाही म्हणून तरुण अवैध धंद्यांकडे जातात, हे तर्कशास्त्र मला मान्य नाही. घरात पैसे आले की प्रश्न सुटतात हे खरे आहे, पण 'ड्रग्ज' किंवा 'अवैध धंदे' ही एक कीड आहे, एक माफिया नेक्सस आहे. पुण्यात आयटी क्षेत्रात रोजगार आहे, तिथे गांजा किंवा ड्रग्ज मिळत नाही का? मिळतोच! नोकरी आणि हा गुन्हेगारीचा विषय वेगळा आहे. हे नेक्सस तोडण्याचे काम पोलिसांचे आहे. मी एसपी साहेबांना थेट विचारले की, आम्ही तुम्हाला कधी रस्त्यावर उतरून कारवाई करताना पाहत नाही. या केवळ धाडी टाकून प्रश्न सुटणार नाहीत, मुळापर्यंत जावे लागेल. धाडी पडूनही लोक अजून धंदे करत आहेत, याचा अर्थ पोलिसांचा धाक संपला आहे का? माझे हात स्वच्छ आहेत म्हणून मी उघडपणे बोलतोय. या अवैध धंद्यांचे गोव्याशी लिंक आहे, काही लोकांच्या रुग्णवाहिका (अँब्युलन्स) आणि गाड्यांमधून हे चालते. जिल्ह्यातील ७० ते ८०% सीसीटीव्ही बंद आहेत, मग पोलीस विजिलन्स काय करतंय? मी पुढच्या २५ दिवसांत यावर दुसरी पत्रकार परिषद घेणार आहे, हा विषय मी सोडणार नाही!"














