
- कणकवलीत कै. श्रीधर नाईक स्मृतिदिन सोहळा
कणकवली : श्रीधर नाईक यांचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच उभे राहिले होते. पण त्याच काळात त्यांची हत्या झाली. ही हत्या राजकीय सुड बुद्धीतूनच होती, असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.
कै. श्रीधर नाईक ३५ वा स्मृतिदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने नरडवे नाका येथील श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थित पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत, नगराध्यक्ष संदेश पारकर, ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, महिला आघाडी प्रमुख निलम पालव - सावंत, मुरलीधर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, जाई मुरकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, उत्तम लोके, धीरज मेस्त्री आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कै. श्रीधर नाईक फाऊंडेशनच्यावतीने वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. तसेच २०० शेतक-यांना वृक्षरोपे देऊन गौरविण्यात आले. यावेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. २० शेतक-यांना गणवेश वाटप करण्यात आले.
श्रीधर नाईकांचे विचार सुशांत - संकेत जपताहेत
राऊत म्हणाले, वृत्तपत्रातून मी मुंबईत श्रीधर नाईक यांच्या खुनाच्या बातम्या वाचल्या. परंतु, श्रीधर नाईक यांनी त्या काळात केलेल्या सामाजिक बांधिलकीचा वसा गेली अनेक संकेत आणि सुशांत नाईक जपत आहेत. आता विचारांचे राजकारण राहिले नाही, राजकारण केवळ आता सत्तेच्या जीवावर चालले आहे. त्यावेळी काँग्रेस आणि समाजवादी लोकांनी निर्माण केलेला विचार केव्हाही संपू शकत नाही. नाईक कुटुंबियांवर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधीलकी सुरु आहे. कणकवली जनतेने पुन्हा नाईक कुटुंबावर विश्वास दाखवला असल्याचे प्रतिपादन विनायक राऊत यांनी केले.
श्रीधर नाईकांमुळे मी निवडून आलो
सुधीर सावंत म्हणाले, माझ्या निवडणूकीत कै. श्रीधर नाईक यांनी खूप मोठे काम केले, गावागावात जाऊन काम केले, त्यामुळे मी निवडून आलो. त्यानंतर मी दिल्लीला जाऊन येताना वाटेत बातमी आली की, श्रीधर नाईक यांची हत्या झाली. श्रीधर नाईक आमच्यातून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत.
सत्याची लढाई सुरूच राहील
वैभव नाईक म्हणाले, श्रीधर नाईकांची ३५ व्या वर्षी हत्या झाली. पण आजही आम्हा नाईक कुटुंबीयांकडून तेवढ्याच उमेदीने काम होत आहे, हीच खरी श्रद्धांजली आहे. त्यावेळी छोटी छोटी कामे केली त्यातून राजकीय उदय कै. श्रीधर नाईक यांचा झाला. मात्र, त्यांची राजकीय हत्या झाली. मात्र, त्या काळात केलेले काम आणि विचार आजही जिवंत आहे. आम्ही हा कार्यक्रम करताना नव्या पिढीसमोर विचार ठेवण्याचे काम करत आहोत. नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली आहे. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहिल.
...म्हणूनच श्रीधर नाईकांचा राजकीय बळी
संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक यांचे बलिदान होऊन ३५ वर्षे झाली आहेत. ज्यावेळी जिल्ह्यात श्रीधर नाईक प्रखर काँग्रेसचा विचार घेऊन काम करत होते. त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. त्यावेळी मेजर सुधीर सावंत यांना तिकीट दिले, त्यावेळी त्यांना निवडून आणण्याचे काम श्रीधर नाईक यांनी केले. हा विजय विरोधकांना सहन झाला नाही, त्यावेळी नेतृत्वाला संपविण्यासाठी राजकीय बळी घेण्यात आला. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत विचार आणि तत्व बाजूला ठेवले जात आहे.
नाईक कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी
निलम पालव - सावंत म्हणाल्या, श्रीधर नाईक यांचा राजकीय बळी होता हे सर्वश्रुत आहे. सामाजिक बांधिलकीचे काम नाईक कुटुंबीय सातत्याने काम करीत आहेत.
श्रीधर नाईकांच्या विचारांवरच कार्यरत
अरविंद मोंडकर म्हणाले, श्रीधर नाईक यांनी जिल्ह्यात काँग्रेस रुजविण्याचे काम केले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस त्यांच्या विचारावर काम करत आहे. यापुढील काळातही हा विचार जपण्याचे काम आम्ही करु.
वडिलांचे विचार जपत राहू :सुशांत नाईक
प्रास्ताविकात सुशांत नाईक म्हणाले, आमच्या वडिलांसारखे सामाजिक कार्य करणा-या नेतृत्वाचे विचार कशा पध्दतीने संपवले जातात, हे झालेल्या घटनेतून दिसून आलेले आहे. त्यानंतर सातत्याने श्रीधर प्रेमी यांच्याकडून गेली 35 वर्षे सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम घेत स्मृतीदिन साजरा होतो. श्रीधर नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सत्कार असो मॅरेथॉन स्पर्धा असो, एखाद्या स्कूलला मदत किंवा वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम आम्ही घेत आहोत. नाईक कुटुंबियांनी जनतेशी जोडलेली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे वैभव नाईक, संकेत आणि मी देखील कणकवलीच्या 13 ते 17 या प्रभागांमध्ये आम्ही सातत्याने निवडणून येत आहोत. शहरविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणूकीत आम्ही इतिहास घडवलेला आहे. भ्रष्ट विचारांच्या विरोधात लढताना याच प्रभागांमध्ये नगराध्यक्ष संदेश पारकर यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने विजय झाला. त्यामुळे वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.










