LIVE UPDATES

सावंतवाडीतील उप-परिसराची सिनेट सदस्यांकडून गंभीर दखल

कोकणसाद इमपॅक्ट | मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 21:58 PM
views 102  views

सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी येथे सुरू असलेल्या मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उपकेंद्राच्या दुरावस्थेबाबत कोकणसादने केलेल्या वृत्ताची गंभीर दखल मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांकडून घेण्यात आली. त्यांनी आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र कुलकर्णी यांना याबाबत पत्र दिल. वेळप्रसंगी राज्यपालांच लक्ष वेधू पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थांच नुकसान होऊ देणार नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले.

या विषयाबाबतचे पत्र मुंबई विद्यापीठाला देत युवासेना सिनेट सदस्यांकडून मागणी करण्यात आली आहे. यात मुंबई विद्यापीठ भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा परीसर आहे. त्यामुळे विद्यापीठात आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि निगडीत प्रशासकीय कामासाठी मुंबईत येणे जिकरीचे असते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने विविध ठिकाणी उपकेंद्र (ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इ.) सुरु केले. पण, अनेक उपकेंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यांपैकी सिंधुदुर्ग उपकेंद्र ज्याचे अनावरण तत्कालीन महामहीम राज्यपाल आणि स्थानिक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत झाले होते. त्या परिसराची एक चित्रफीत आली असून त्यामध्ये उपकेंद्र, तेथील वर्ग आदींची पडझड झालेली दिसत आहे. किंबहुना विद्यार्थी बसत होते तेथील छताचा भाग कोसळला आहे. सुदैवाने हा प्रकार पहाटे घडल्याने विद्यार्थी नव्हते, नाहीतर मोठा अपघात घडू शकला असता. तुर्त तेथील परिस्थिती कशी आहे याची माहिती मिळावी अशी आग्रही मागणी सदस्यांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, परमात्मा यादव, माजी सदस्य राजन कोळंबेकर आदी उपस्थित होते. 


दरम्यान, कोकणसादमुळे हा विषय लक्षात आला. मी देखील कोकण सुपुत्र असून तत्कालीन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी हे उपकेंद्र सुरू केलं. मात्र, आज तुमच्या बातमीनंतर तेथील शोकांतिका लक्षात आली‌. माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून आम्ही याबाबत माहिती घेतली. आज सावंतवाडीच्या नगराध्यक्षांचे पती देखील मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत. मुंबई विद्यापीठाने या प्रकारणात उदासीनता दाखवलेली असताना सिनेट मेंबर म्हणून त्यांनी देखील लक्ष घातलं असतं तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच भल झाल असत. मात्र, हा विषय कोकणसादच्या माध्यमातून कळला असल्याने तो विषय आम्ही लावून धरणार आहोत. पूर्वीसारखचा उप-परिसर तिथे सुरू झालेला दिसेल. तसेच याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही आम्ही भेट घेणार असून त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांच्याकडून न्याय न मिळाल्यास राज्यपालांकडे दाद मागू‌. मात्र, हा उप परिसर येथून हलू देणार नाही. सिंधुदुर्गच्या मुलांच नुकसान होऊ देणार नाही असा विश्वास सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केला.