LIVE UPDATES

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 22, 2026 13:25 PM
views 21  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जिल्हा न्यायालय संकुल, ओरोस येथे पार पडला. कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके, सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. ए. कानशिडे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. नडगदल्ली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर यांच्यासह न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योग शिक्षक तथा भारत स्वाभिमान ट्रस्ट, सिंधुदुर्गचे प्रभारी डॉ. तुळशीराम रावराणे यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनशैली कशी विकसित होते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास निरोगी आणि संतुलित जीवन जगता येते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ. सुधीर देशपांडे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. "योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समन्वय आहे. योग आपल्याला मनःशांती, सुदृढ आरोग्य आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देतो. श्वासावर नियंत्रण ठेवून जीवनात समतोल साधण्याची कला योग शिकवितो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या शरीराचा, मनाचा आणि आत्म्याचा सन्मान करत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे," असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगासने व प्राणायामाचा सराव केला. योग दिनाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.