LIVE UPDATES

मांगेलीत चैतन्‍याचा ‘दबदबा!’

मनमोहक निसर्ग पर्यटकांना खुणावतोय पायाभूत सुविधांची वानवा रोजगारनिर्मितीच्‍यादृष्‍टीने विकास आवश्‍यक
Edited by: लवू परब
Published on: June 17, 2025 17:19 PM
views 62  views

दोडामार्ग : पहिल्या सरींनी मातीतील गंध दरवळला. तृप्त झालेली भूमी आसमंत गंधीत करते. साऱ्या वातावरणात एक चैतन्य! निसर्गातला हा अनोखा उत्सव प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. प्रत्येक पानावरून ओघळणाऱ्या थेंबात एक वेगळीच लय असते. हिरवा शालू परिधान केलेली धरित्रीवर शुभ्र फेसाळणार्‍या धबधब्‍यांचे नृत्‍य सुरू होते. पंख फडफडवत पक्षीही आनंदगाणी गातात...कोकणातील पावसाचं सौंदर्य असंच मनभावन! येथील धबधब्‍यांचा दबदबा पर्यटकांत तर आहेच पण कला, संस्‍कृतीच्‍या प्रेमातही पर्यटक आहेत. सिंधुदुर्गातील धबधबे पावसाळी पर्यटनाला चार चाँद लावतात. इथे तीन राज्‍यांना सोबत घेऊन फेसाळणारा विलोभनीय धबधबा आहे, तो म्‍हणजे दोडामार्ग तालुक्‍यातील मांगेली, फणसवाडी येथील धबधबा. वर्षा पर्यटनासाठी यंदाही मांगेली सज्‍ज आहे. 

वर्षा पर्यटनाला जायचे तर शांत, रमणीय, स्‍वच्‍छ आणि सुरक्षीत असं ठिकाण नेहमी पर्यटक निवडतात. दोडामार्ग तालुका असाच डोंगरांना कुशीत घेऊन विसावला आहे. त्‍यामुळे रिमझिम बरसणारा पाऊस, दाट धुके, गगनचुंबी पर्वत, आणि तिलारीचे विलोभनीय जलाशय आणि त्‍यात भर म्‍हणजे मांगेलीचा धबधबा, पर्यटकांचे आज आकर्षण बनून राहिला आहे. 

मांगेली धबधबा देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण

मांगेली धबधबा देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने मांगेलीत येतात. उंच आणि थंड हवेचे ठिकाण, संपूर्ण परिसरावर दिवसभर दाट धुक्‍याची दुलई, अंगाखांद्याला स्पर्शून जाणारा गार वारा आणि रिमझिम पाऊस याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असल्याने विकेंडला तेथे खूप गर्दी असते. शिवाय मांगेली धबधबा जसा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसाच धबधब्याचा परिसर ट्रेकिंगसाठी सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधबा कधी सुरू होतो याची प्रतीक्षा असते. यंदा हा धबधबा आता प्रवाहित झाला आहे.  मांगेली धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला दोडामार्ग तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतर पार करून जावे लागते. परंतु डोंगर कपारीत वसलेली गावे पायदळी तुडवित जात असताना अद्भुत निसर्ग सौंदर्याने नटलेली वनश्री आपल्याला अनुभवता येईल.

दरडी पासून सावधान 

गतवर्षी मांगेली धबधबा परिसरातील एका ठिकाणचा भाग कोसळलाहोता. त्‍यामुळे धबधब्‍याच्‍या ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांवर बंदी घालण्‍यात आली होती. मात्र तो दरडीचा भाग आजही धोकादायक आहे. त्‍यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासन आणि स्‍थानिक ग्रामस्‍थांकडून केले जात आहे. 

तळीरामांना आवरणार कोण?

मांगेली धबधबा दुर्गम आणि एकांत ठिकाणी असल्‍यामुळे याठिकाणी गोव्‍यातील पर्यटक मोठ्या संख्‍येने येतात. गोव्‍यावरून मोठ्या प्रमाणात येथे दारू आणली जाते. पोलीस बंदोबस्‍त मर्यादित असल्‍यामुळे हुल्लडबाजी आणि मद्यधुंद अवस्‍थेत धिंगाणा घालणार्‍यांची संख्‍या वाढत आहे. त्‍यामुळे असे गैरप्रकार रोखण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक याठिकाणी नेमण्‍याची गरज आहे. 

घाट पायऱ्या होणे आवश्यक : पर्यटक

मांगेली येथील धबधबा डोंगराच्या माथ्यावरून खाली कोसळतो. इथ पर्यंत पर्यटक उंचावरून पडणाऱ्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात; पण पायथ्याच्या ठिकाणापर्यत जाताना अवघड पायवाट असल्याने आणि मोठ मोठे दगड असल्याने पर्यटकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे घाट पायऱ्या होणे आवश्यक आहेत, अशी मागणी आलेले पर्यटक करीत आहेत.

महिलांसाठी चेंजिंग रूम आवश्यक

पर्यटकांमध्ये महिलांचा समावेश अधिक असतो. त्‍यामुळे धबधब्‍याच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजीग रूम नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रा. पं. आणि ग्रामस्थ यांनी याबाबत पुढाकार घेत महिलांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी महिला पर्यटकांतून होत आहे. 

पायाभूत सुविधांची वानवा...

पर्यटन विकासातून सिंधुदुर्गची समृद्धी साधण्‍यासाठी अशा पर्यटनास पोषक आणि रोजगार निर्मितीस वाव असलेल्‍या पर्यटनस्‍थळांचा विकास करण्‍याची गरज आहे. येथे येणार्‍या पर्यटकांसाठी कोणत्‍याही पायाभूत सुविधा नाहीत. धबधबा परिसर धोकादायक स्‍थितीत आहे, अशा अवस्‍थेत आजूबाजूच्‍या परिसराचे सुशोभिकरण करण्‍याबरोबरच येणारे पर्यटकांचे आदरातिथ्‍य आणि मालवणी भोजनाचा आस्‍वाद पर्यटकांना घेता येत नाही. त्‍यामुळे धबधबा परिसर आणि एकंदरीत या पर्यटनस्‍थळाचा रोजगारनिर्मितीच्‍या दृष्‍टीने विकास होण्‍याची गरज आहे. पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांनी या पर्यटन स्‍थळाच्‍या विकासाकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.