साद पुन्हा नव्या पर्वाची

विशेष संपादकीय
Edited by:
Published on: May 01, 2026 07:06 AM
views 73  views

आज एक मे, महाराष्ट्र दिन, कामगार दिनासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवस. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. वास्तविक भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सिंधुदुर्ग हा एक स्वतंत्र अस्तित्व असलेलाच जिल्हा आहे. गोव्याला लागून असलेला हा जिल्हा राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत तर आहेच, परंतु अनेक बाबतीत लक्षणीय वाटचाल करत या जिल्ह्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आज एक खासदार, चार आमदार आणि एक मंत्रीपद असे सत्ताधारी पक्षाचे मोठे पाठबळ सिंधुदुर्गला लाभले आहे. त्या माध्यमातून विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू आहे. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजकीय पातळीवर मोठे प्रयत्न सुरू आहेत. अनेक बाबतीत हा जिल्हा एक नवा इतिहास घडवताना दिसत आहे.

माध्यमांच्या बाबतीत तर सुरुवातीपासूनच सिंधुदुर्गने आघाडी घेतली आहे. कोकणात डिजिटल मीडियाची मुहूर्तमेढ रोवली ती याच भूमीत. अगदी सुरुवातीला जेव्हा लँडलाईन फोनही सगळीकडे पोहोचले नव्हते, तेव्हा "सिंधुदुर्ग लाईव्ह" या तळकोकणातील पहिल्या डिजिटल मीडियाने गावागावातल्या बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या. पहिली स्थानिक वाहिनी, डिजिटल प्लॅटफॉर्म ते दैनिक असा अत्यंत वैभवशाली प्रवास आज इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरला गेला आहे.

एक मिशन म्हणून आम्ही हाती घेतलेले हे कार्य आज सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या कोकणची ओळख बनून गेले आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कोकणातील अनेक प्रश्नांना न्याय देण्यात, इथल्या अनेक व्यक्तिमत्त्वांना प्रकाशात आणण्यात या टीमने केवळ पुढाकारच घेतला नाही, तर एक कर्तव्य म्हणून हे काम पार पाडले. बातमीची विश्वासार्हता पुन्हा एकदा निर्माण केली ती आम्हीच. पारंपरिक पत्रकारितेच्या परिघाबाहेर जाऊन अनेक इव्हेंट यशस्वीरीत्या राबवले, जे प्रदीर्घ काळापर्यंत कोकणच्या लक्षात राहतील.

बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत अत्यंत सुसंस्कृत आणि प्रभावी पत्रकारिता कशी असते, याचे एक अत्यंत चांगले मॉडेल या माध्यमातून आम्ही देऊ शकलो, ते आमच्या टीमवर्कमुळे. आज पुन्हा हे मिशन एका नव्या जोमाने पुढे नेताना अत्याधिक आनंद याचसाठी आहे की एका सातत्याने पुढे जाणाऱ्या, प्रगतीपथावर राहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यम क्षेत्रात पुन्हा एकदा नवा इतिहास कोरण्याची संधी मिळते आहे.

आज "कोकणसाद" हा कोकणचा मिडिया ब्रँड जरूर बनला आहे, परंतु त्यामागे मोठी मेहनत आणि परिश्रम आहेत. समाजातील प्रत्येक घटकाशी सुसंवाद ठेवणे, राजकारण, संस्कृती, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा समतोल टिकवणे आणि सर्वाधिक चांगला कंटेंट देणे, याला आजही आम्ही प्राधान्य देतो, कारण हीच आमची ओळख आहे. असा कंटेंट ज्यावर संबंधित यंत्रणेला विचार करावाच लागतो. इतकी ताकद आमच्या टीमने गेल्या काही वर्षांत निर्माण केली आहे.

दररोज नवनवीन आव्हाने समोर येत आहेत, परंतु ही आव्हाने समर्थपणे पेलण्याची ताकद आज "कोकणसाद" या नावात आहे.

नवीन जबाबदारी पेलताना एक नवा आत्मविश्वास याचसाठी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा आणखी पुढे नेण्यात आता आमच्या टीमला सोबत घेऊन नव्याने हे मिशन पुढे न्यायला मिळणार आहे. "कोकणसाद लाईव्ह" आणि दैनिक "कोकणसाद" हे अवघ्या कोकणवासियांचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा वापर अगदी समाजातील शेवटच्या स्तरातील प्रश्न सोडवण्यासाठी कसा होईल, नव्या पिढीला या क्षेत्राच्या माध्यमातून परिवर्तनाच्या कार्यात कसे सक्षमपणे सहभागी करून घेता येईल, हाच आमचा प्रयत्न असणार आहे.

"कोकणसाद लाईव्ह" आणि दैनिक "कोकणसाद"च्या मुख्य संपादकपदाची धुरा नव्याने सांभाळताना इतकेच ध्येय आहे, या स्वर्गाहून सुंदर अशा जिल्ह्याच्या जडणघडणीत "कोकणसाद"ला अग्रस्थानी ठेवायचे आणि जे लागेल ते योगदान द्यायचे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने जगभरातील सर्व सिंधुदुर्गवासियांना कोकणसाद परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा !


सागर चव्हाण 

मुख्य संपादक, कोकणसाद LIVE - दै. कोकणसाद