LIVE UPDATES

वैभववाडी तालुका शिक्षण संकुलात प्रवेशोत्सव उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 15, 2026 21:30 PM
views 30  views

वैभववाडी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त वैभववाडी तालुका शिक्षण संकुलात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देताना नियमित अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि चांगल्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षकांनी त्यांना शालेय जीवनाबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, विजय रावराणे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.