
कणकवली : फोंडाघाट ते दाजीपूरच्या दिशेने सुझुकी कार मधून गायीच्या लहान लहान तीन वासरांची बेकायदेशीररित्या गाडीत कोंबून वाहतूक करताना आढळून आल्या प्रकरणी रमेश विश्राम राणे (३६),विशाल विश्राम राणे (३५),योगेश सुदाम गुरुखंडे(३४, तिन्ही रा.लोरे), प्रतिक प्रकाश भिसे(३२ रा.फोंडाघाट) यांच्यावर कणकवली पोलिसांनी प्राण्यांचा छळ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई फोंडाघाट चेक नाक्यावर रविवार सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास करण्यात आली.
फोंडाघाट चेक नाक्यावरुन संशयीतांची गाडी जाताना पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी पुढे जाऊन गाडी थांबवली. गाडीमध्ये तीन लहान लहान गायीची वासरे आढळून आली. ही वासरे बाहेर काढून ते दाजीपूरच्या दिशेने गेले. रात्री ते पुन्हा आले. जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन चारा पाण्याची व्यवस्था केली. दीड लाखाची कार आणि प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये किंमतीची वासरे असा मुद्दे माल जप्त करण्यात आला. अधिक तपास फोंडाघाट पोलिस करत आहेत.










