LIVE UPDATES

सिंधुदुर्गात माणुसकीचा 'ऑन कॉल' हुंकार!

व्हॉट्सॲप ग्रुप ते १२,०००+ सैनिकांची जीवनदायी चळवळ
Edited by: स्वप्नील परब
Published on: June 13, 2026 22:50 PM
views 107  views

"रक्तदान हे केवळ कर्तव्य नव्हे, तर मृत्यूच्या उंबरठ्यावरील कोमेजत्या जिवाला दिलेले नवसंजीवनीचे वरदान आहे! विज्ञानाच्या कोणत्याही कारखान्यात न निर्माण होणारे हे मानवी रक्त जेव्हा एखाद्याच्या धमन्यांमध्ये धावून जाते, तेव्हा तिथे माणुसकीचा एक नवा इतिहास लिहिला जातो. याच निस्वार्थ भावनेतून, '१४ जून' या जागतिक रक्तदाता दिनाचे पवित्र औचित्य साधून 'ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग' या माऊलीरूपी संस्थेचा जन्म झाला. ऊन-पावसाची तमा न बाळगता, अहोरात्र २४ तास रुग्णसेवेसाठी धावणाऱ्या या देवदूतांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांना जीवनदान देऊन मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणले आहे. 


रक्‍तदाता दिन विशेष.....

स्‍वप्‍नील परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अविरतपणे रुग्णसेवा करणाऱ्या 'ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग' या संस्थेने आपल्या कार्याचा एक वेगळा आणि आदर्श ठसा उमटवला आहे. सुरुवातीला काही ठराविक तरुण एकत्र आले आणि त्यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याचे ठरवले. रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास व्हॉट्सॲप समूहावर येणाऱ्या पोस्टचा पाठपुरावा करून ते वेळेवर रक्त उपलब्ध करून देत असत. पुढे या तरुणांचे कार्य पाहून सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली 'ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग' या संस्थेची रीतसर नोंदणीकृत स्थापना १४ जून २०२४ रोजी करण्यात आली. 

अहोरात्र अविरत सेवा: २४ तास सुसाट- संस्थेचे सल्लागार म्हणून गुरुनाथ नार्वेकर हे मार्गदर्शन करत असून, तब्बल ३४ वेळा रक्तदान केलेले सिद्धार्थ पराडकर हे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष युवा रक्तमित्र महेश रेमुळकर आणि सचिव बाबली गवंडे हे रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि प्रशासकीय नियोजन चोखपणे पार पाडतात. विशेष म्हणजे, रक्ताच्या तातडीच्या गरजेसाठी या तिघांचेही मोबाईल २४ तास कार्यरत असतात.

संस्थेच्या कार्याचा सुवर्ण आलेख- १,२००+ रक्तदाते: संस्थेशी आजघडीला सुमारे १२,००० हून अधिक अनुभवी आणि नियमित रक्तदाते जोडले गेले आहेत.

८०+ यशस्वी शिबिरे: विविध मित्र संस्था आणि मंडळांच्या सहकार्याने आतापर्यंत ८० हून अधिक रक्तदान शिबिरे पार पडली आहेत.

३,०००+ रक्तबाटल्यांचे संकलन: रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ३ हजारांहून अधिक रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या आहेत.

२७०+ रुग्णांना जीवनदान: अति तातडीच्या प्रसंगी 'ऑन कॉल' धावून जात या संस्थेने २७० पेक्षा जास्त रुग्णांना मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले आहे.

रक्तदात्यांना 'विमा कवच'- ऊन-पावसाची तमा न बाळगता धावणारे तरुण अति तातडीच्या वेळी रक्ताची गरज असताना स्वतःची मोटारसायकल घेऊन, ऊन-पावसाची तमा न बाळगता अनेक युवक रक्तदानासाठी धावून जातात. या धाडसी रक्तदात्यांच्या सुरक्षेची काळजी घेत संस्थेने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. संस्थेमार्फत आतापर्यंत १४० पेक्षा जास्त रक्तदात्यांचा अपघात विमा उतरवण्यात आला आहे, जेणेकरून या सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबालाही सुरक्षितता लाभेल.

सहकार्य करणाऱ्या प्रमुख मित्र संस्था- संस्थेच्या या महायज्ञात सिंधुदुर्गातील जवळपास ३० हून अधिक नामांकित मंडळे आणि संस्था खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने: श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळ (मातोंड), ओटवणे चॅरिटेबल ग्रुप, प्रकाश परब मित्र मंडळ (तळवडे), स्वराज्य रक्षक युवक मंडळ व शिवशक्ती कला क्रीडा मंडळ (कलंबिस्त), शिवप्रेमी मित्रमंडळ (आजगाव), श्री रवळनाथ प्रतिष्ठान (मातोंड). मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (सुकळवाड). मायकल डिसोजा मित्र मंडळ (आंबोली), युवा विकास प्रतिष्ठान व माटेश्वर मित्रमंडळ (सांगेली), माऊली बॉईज (कळणे), जुस्तीननगर मित्र मंडळ (पडवे-माजगाव), श्री देवी शेंडोबा माऊली कला क्रीडा मंडळ (देवसू). रेन्बो फ्रेंड सर्कल (कवठणी), बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, श्री हनुमान मंदिर उत्सव समिती आणि सावंतवाडी पत्रकार संघ (सावंतवाडी). रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, टू व्हीलर मेकॅनिकल संघटना (सावंतवाडी), स्वराज्य युवा मित्र मंडळ (दांडेली-आरोस), जय शंभो कला क्रीडा मंडळ (माजगाव). श्री स्वराज्य प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक विकास मंच आणि सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ कट्टा कॉर्नर (बांदा).

रक्तदानाचे महत्त्व आणि आजची गरज- भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ०.६ टक्के लोकच रक्तदान करतात, ज्यामुळे देशभरात रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्ताची गरज असते. मानवी शरीरात साडेचार ते पाच लिटर रक्त असते. पुरुष दर ३ महिन्यांनी तर महिला दर ४ महिन्यांनी सुरक्षितपणे रक्तदान करू शकतात. प्लेटलेट दान तर दर एका महिन्याने करता येते. रक्तदान केल्याने शरीराला कोणतीही इजा होत नाही, उलट ३६ तासांत रक्ताची पातळी आणि ३ ते ४ आठवड्यांत रक्तपेशी पूर्ववत होतात. "तुमचे रक्त, कोणाचे तरी प्राण!" हा संदेश केवळ भिंतीवर न राहता तो प्रत्यक्षात जगणाऱ्या 'ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग' या संस्थेचे कार्य संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. या जागतिक रक्तदाता दिनी त्यांच्या या पवित्र कार्याला 'कोकणसाद' परिवारातर्फे मानाचा मुजरा!