LIVE UPDATES

कुणालाही शासनाची जागा फुकट देऊ नका !

निलेश राणेंकडून नगराध्यक्षांचे कौतुक | मायकल डिसोजांना टोला
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 13, 2026 19:46 PM
views 161  views

सावंतवाडी : नितेश राणे आणि निलेश राणे तुमच्या सोबत आहे. कुणालाही शासनाची जागा फुकट देऊ नका, तुम्ही दिलेला रेट आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त रेट सावंतवाडीत आहे अशी चर्चा होऊदेत. उत्पन्न वाढवले यात वाईट काय ? अनेकांच्या संस्था जिल्ह्यात आहेत. मात्र, आम्ही कधी शासनाकडे फुकट द्या, कमी दराने द्या म्हणून मागितलं नाही‌. पण, काहीजण छाती ठोकून सांगतात मला फुकट दिली नाही असा टोला हाणत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे कौतुक केले. 

आम. राणे म्हणाले, शासनाची जागा  कशासाठी फुकट देणार ? मग, उद्या सगळेच सांगितील आम्ही रोजगार देतो जागा फुकट द्या. प्रशासनाच्या नियमानुसार काम होणार असून संबंधित लोक आपल्या उत्पन्नातील नगरपरिषदेला वाटा देणार का ? तसा देत असतील तर ठीक आहे. मात्र, फुकट जागा देऊ नये असं सांगत निलेश राणे यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे अभिनंदन केले. जिल्ह्याच उत्पन्न वाढवण आपलं काम आहे‌ असही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक जण पक्षात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे 'ऑपरेशन टायगर' ही केवळ एक-दोन महिन्यांची मोहीम नसून, ती सातत्याने सुरूच राहणार आहे, असा दावा आमदार श्री. राणे यांनी केला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे हे केवळ बैठका घेण्याचे काम करत आहेत. त्यांच्या बैठकांना नेमके किती आमदार आणि खासदार उपस्थित असतात, हे आधी मोजले पाहिजे. कधीतरी दोन महिन्यांतून एकदा बाहेर पडायचे आणि केवळ वक्तव्ये करायची, या पलीकडे त्यांच्याकडे काहीही उरलेले नाही. जनता आणि लोकप्रतिनिधी आता त्यांच्या या भूमिकेला कंटाळले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा वेग आणि त्यांच्याकडून प्रत्येकाला मिळणारा न्याय यांमुळे विविध पक्षांतील लोक आज आमच्याकडे आकर्षित होत आहेत. लोकांचा शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. याउलट, विरोधी पक्षातील नेत्यांकडे आता कोणतेही भविष्य राहिलेले नाही. त्यामुळेच 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत येत्या काळातही अनेक मोठे प्रवेश पाहायला मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी  व्यक्त केला.