LIVE UPDATES

कोकण रेल्‍वे दुपदरीकरणासाठी केंद्राकडे प्रस्‍ताव

Edited by: स्वप्नील परब
Published on: June 13, 2026 16:46 PM
views 93  views

सिंधुदुर्ग : सुमारे ७४१ किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे मार्गापैकी ९० टक्क्यांहून अधिक भाग आजही एकेरी असल्याने या मार्गावरील वाढती वाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सवाच्या काळातील अतिरिक्त गाड्यांचे नियोजन ही आव्हाने कोकण रेल्वे समोर आजही कायम आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या दशकभरापासून चर्चेत असलेल्या कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण प्रकल्पाला नवी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून पुढील टप्प्यातील कामांसाठी कोकण रेल्वे महामंडळाने केंद्र सरकारकडे निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच प्राधान्याच्या विभागांमध्ये तांत्रिक तपासणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पावसाळापूर्व तयारीच्या आढावा बैठकीनंतर दुपदरीकरणासंदर्भातील ही माहिती दिली. मुंबई, गोवा, कर्नाटक आणि केरळला जोडणाऱ्या या मार्गावर गेल्या काही वर्षांत प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र एकेरी मार्गामुळे रेल्वेच्या वहनक्षमतेवर मर्यादा येत असल्याने कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे.

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दा नवीन नसून २०१४ पासून विविध टप्प्यांतील प्रस्तावांवर चर्चा सुरू आहे. मात्र निधी, भौगोलिक अडचणी आणि तांत्रिक गुंतागुंत यामुळे प्रकल्पाला अपेक्षित गती मिळू शकली नव्हती. सह्याद्री पर्वतरांगा, खोल दऱ्या, अनेक पूल आणि ९० हून अधिक बोगद्यांमधून जाणारा हा मार्ग असल्याने दुपदरीकरण हे भारतीय रेल्वेपुढील सर्वाधिक आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक मानले जाते.