
वैभववाडी : वेंगसर सोनारवाडी येथे गोवा बनावटीची दारू बेकायदा विक्री करत असल्याप्रकरणी पोलिसांनी रणजित दामोदर नार्वेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १० हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
वेंगसर परिसरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव तसेच पोलीस कर्मचारी हरेष जायभाय आणि गणेश भोवड यांनी परिसरात पाळत ठेवली होती. दरम्यान, संशयित रणजित नार्वेकर हा आपल्या घराजवळच गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून १८० मिली क्षमतेच्या गोवा बनावटीच्या दारूच्या १४४ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी रणजित नार्वेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.










