LIVE UPDATES

सिंधुदुर्गची त्रिवेणी 'गुरु'किल्ली!

राऊळ महाराज, भालचंद्र महाराज, टेंब्‍ये स्वामी : कोकणच्या भूमीला लाभले तीन आध्यात्मिक गुरू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 21:10 PM
views 52  views

सिंधुदुर्ग ही केवळ वीरांची नव्हे, तर अवधूत, नाथ आणि सिद्ध पुरुषांची तपोभूमी आहे. गुरुपौर्णिमेच्या या पावन आणि मंगल प्रसंगी, जेव्हा मन कृतज्ञतेने नतमस्तक होते, तेव्हा डोळ्यांसमोर उभी राहते ती सिंधुदुर्गाची अथांग आणि समृद्ध गुरुपरंपरा! दत्त परंपरेचा ज्ञानदीपक ते नाथांच्या सिद्धीचा सुवास या भूमीने प्रत्येक युगात विश्वाला मार्गदर्शक ठरेल अशा गुरुकृपेचा अमूल्य वारसा जपला आहे.  आषाढातल्या तृप्त धारांसोबत जेव्हा 'गुरुपौर्णिमा' उजाडते, तेव्हा या भूमीतील कणाकणातून सद्गुरूंच्या अपार कृपेची आणि अखंड परंपरेची सुरेल स्पंदने उमटू लागतात. श्री टेंबे स्वामींची कठोर तपश्चर्या, राऊळ महाराजांचे अवधूत वात्सल्य आणि भालचंद्र महाराजांची अथांग कृपा... या सर्वांनी विणलेला सिंधुदुर्गाचा हा गुरुपरंपरेचा शालू आजही तितकाच अलौकिक आणि आत्मानंद देणारा आहे.


गुरुपौर्णिमा विशेष 

सिंधुदुर्गातील गुरुपरंपरा मुख्यत्वे नाथ संप्रदाय, दत्त परंपरा, वारकरी संप्रदाय आणि समर्थ रामदास स्वामींची दासबोध परंपरा या चार प्रमुख प्रवाहांच्या संगमातून आकारास आली आहे. सिंधुदुर्गात दत्त उपासनेचा प्रभाव अत्यंत खोलवर आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) आणि त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून ही परंपरा जिल्ह्यात रुजली. श्री टेंबे स्वामी महाराज हे दत्त संप्रदायातील अग्रगण्य आणि अत्यंत कडक आचारधर्म पाळणारे महापुरुष होते. माणगाव हे त्यांचे जन्मस्थान असून, त्यांनी येथेच दत्तप्रभूंच्या मूर्तीची स्थापना केली. त्यांनी रचलेली स्तोत्रे आणि दत्त भक्तीचा प्रसार यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रात दत्त संप्रदायाची लाट आली. माणगाव हे आज दत्त भक्तांसाठी पंढरपूर मानले जाते. सिंधुदुर्गाच्या या त्रिवेणी संगमात टेंबे स्वामी म्हणजे 'ज्ञान', राऊळ महाराज म्हणजे 'भक्ती' आणि भालचंद्र महाराज म्हणजे 'कर्म व सेवा'! या तिन्ही सद्गुरूंनी स्थापन केलेली गुरु-शिष्य परंपरा आजही लाखो साधकांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ ठरत आहे.

पिंगुळीचे श्री राऊळ महाराज हे अवधूत स्थितीतील महान संत होते. त्यांचा स्वामी समर्थ परंपरेशी थेट संबंध मानला जातो. अत्यंत साधे जीवन, अबोल पण अत्यंत प्रभावी कृपाशीर्वाद यामुळे त्यांनी हजारो भक्तांना सन्मार्गाला लावले. पिंगुळी येथील त्यांचा मठ आजही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. कोकणातील दऱ्याखोऱ्यांमध्ये नाथ संप्रदायाचे स्थान अत्यंत प्राचीन आहे. नवनाथांपैकी अनेक नाथांचे गमन आणि साधना कोकण किनारपट्टीवर झाल्याच्या आख्यायिका आहेत. सिंधुदुर्गात अनेक गुहा, डोंगर आणि प्राचीन मंदिरे आहेत जिथे नाथ सिद्धांनी तपश्चर्या केली. या परंपरेतूनच जिल्ह्यात गुरु-शिष्य परंपरेत मंत्रदीक्षा, योगसाधना आणि निसर्गाशी एकरूप होण्याची कला जोपासली गेली. 

आधुनिक काळातील अवधूत संत म्हणून श्री भालचंद्र महाराजांचे नाव सिंधुदुर्गात अत्यंत आदराने घेतले जाते. महाराजांनी कणकवलीला आपली कर्मभूमी बनवले. ते बाललीलांसारखे वर्तन करत, परंतु त्यांच्या एका दृष्टिक्षेपाने भक्तांचे संकट दूर होई. कणकवलीतील श्री भालचंद्र महाराज आश्रम हे आजही गुरुभक्तीचे आणि अन्नदानाचे एक खूप मोठे केंद्र आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थापन झालेले दत्त मठ केवळ पूजेची ठिकाणे नाहीत, तर ते 'संस्कार केंद्र' म्हणून काम करतात. सोहिरोबानाथ आंबिये यांनाही नाथ संप्रदाय लाभला. दत्त आणि नाथ संप्रदाय यातून गुरु शिष्‍याची एक मोठी परंपरा सिंधुदुर्ग जिल्‍ह्याला लाभली आहे. आलेला माणूस भुकेला जाता कामा नये" ही सिंधुदुर्गातील मठांची प्रमुख शिकवण आहे. आणि हीच परंपरा आज प्रत्‍येक गुरूस्‍थानी पाळली जाते. प. पू. साटम महाराजांचाही यात समावेश करावा लागेल. 

टेंबे स्वामींनी कठोर आचारधर्म, जप आणि ज्ञानसाधनेची शिकवण देत दत्तभक्तीचा घरोघरी प्रसार केला. त्यांनी रचलेली स्तोत्रे आणि सोपी उपासना पद्धती ही भक्तांसाठी जीवन जगण्याची आचारसंहिता बनली. तर दुसऱ्या बाजूला पिंगुळीचे श्री राऊळ महाराज हे अवधूत स्थितीतील संत होते; त्यांनी ग्रंथांपेक्षा 'अबोल प्रेमाचा' आणि शब्दातीत अनुभूतीचा मार्ग दाखवला. अत्यंत साधेपण आणि एका दृष्टिक्षेपाने भक्तांचे दुःख हरण करण्याची त्यांची शैली गुरु-शिष्य नात्यातील अनन्य शरणतेचे प्रतीक बनली. कणकवलीचे श्री भालचंद्र महाराज यांनी आपल्या निष्पाप बाललीलांमधून 'कपटहीन मन आणि निर्मळ भाव' म्हणजेच खरी साधना, हा महान धडा दिला. भालचंद्र महाराजांनी सुरू केलेला अन्नदानाचा यज्ञ आणि भक्तांना दिलेला अभयहस्त आज हजारो कुटुंबांचा मुख्य आधार आहे. 

गुरु-शिष्याचे नाते हे ज्ञानाचा प्रकाश (टेंबे स्वामी), भक्तीचे समर्पण (राऊळ महाराज) आणि कर्म व सेवेचा प्रवाह (भालचंद्र महाराज) यांच्या त्रिवेणी संगमातून साकारले आहे. या परंपरेत शिष्याला केवळ ज्ञान दिले गेले नाही, तर त्याला संकटात धीर देणारे, भुकेल्याला अन्न देणारे आणि अंतःकरणातील विकार दूर करून जीवन प्रकाशमय करणारे मार्गदर्शक लाभले.

स्‍वप्‍नील परब / सिंधुदुर्ग