LIVE UPDATES

पद, पैसा, प्रतिष्ठेपेक्षा मोठं नातं... मैत्री

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 14:28 PM
views 28  views

रविवारची सकाळ होती. बाहेर हलका पाऊस पडून गेला होता आणि हवेत मातीचा तो ओळखीचा वास दरवळत होता. मी हातात चहाचा वाफाळता कप घेऊन बाल्कनीत बसलो होतो. शेजारी एक जुनी, धुळीने माखलेली पेटी होती — बऱ्याच वर्षांनी तिचं झाकण उघडलं होतं. आत एक फोटो अल्बम होता, कडा पिवळ्या पडलेल्या, काही पानं सुटी झालेली.

मी पहिलं पान उघडलं आणि क्षणभर वेळच थांबली. फोटोत मी होतो — बारीक, काळासावळा, विजार आणि साधा शर्ट घातलेला एक मुलगा. आणि माझ्याभोवती दाटीवाटीने उभी होती दहा-बारा हसरी तोंडं. कुणाच्या हातात भोवरा होता, कुणाच्या खिशातून गोट्या डोकावत होत्या. मी त्या फोटोकडे बघत राहिलो आणि हसू आलं — या पोरांपैकी त्या वेळी कोणालाही माहीत नव्हतं की पुढे कोण डॉक्टर होणार, कोण अधिकारी होणार, कोण उद्योगपती. त्या फोटोत कुणाच्याही नावापुढे "सर", "डॉ." किंवा "साहेब" नव्हतं. होते फक्त मित्र.

चहाचा घोट घेतला आणि मनात एक प्रश्न उगवला — आपण मोठे झालो म्हणजे खरंच मोठे झालो का?

मी सांगतो, ही गोष्ट कोणत्याही मोठ्या घटनेची नाही. ही गोष्ट आहे साध्या साध्या माणसांची — ज्यांनी न बोलता माझं आयुष्य घडवलं. मी आज सरकारी सेवेत मोठ्या हुद्द्यावर आहे. अनेक खुर्च्या पाहिल्या, हजारो हातांशी हस्तांदोलन केलं. रोज कुणीतरी "साहेब, साहेब" म्हणून मागे-पुढे फिरतं. पण त्या गर्दीत, मी जेव्हा शांत बसतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते — "साहेब" म्हणणारी माणसं भरपूर भेटली, पण खांद्यावर हात ठेवून "अरे..." म्हणणारी फार थोडी. आणि माझं खरं आयुष्य त्या "अरे" म्हणणाऱ्या मूठभर माणसांनीच श्रीमंत केलं.

मी अल्बमचं दुसरं पान उलटलं. आता वेगळेच चेहरे होते — मोठे झालेले, मिशी फुटलेले. यातला एकजण आता माझ्या शेजारच्या गावी शेती करतो, एकजण परदेशात स्थायिक झालाय, एकजण... आता कुठेच नाही. मी त्या पानावर बोट फिरवत बसलो आणि जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या.

खरं सांगू का ? मैत्री ही एक विचित्र गोष्ट आहे. यात कुठला करार नसतो, स्टॅम्प पेपर नसतो, अटी नसतात, हमी तर मुळीच नसते — तरीही हे नातं रक्ताच्या अनेक नात्यांपेक्षा जास्त घट्ट टिकतं. आई-वडील आपल्याला देव देतो, भाऊ-बहीण नियती ठरवते — पण मित्र निवडायचं स्वातंत्र्य मात्र देवाने फक्त आपल्यालाच दिलंय. कदाचित म्हणूनच हे नातं इतकं देखणं वाटतं.

अल्बम बंद करण्याआधी शेवटच्या पानावर एक फोटो होता — माझी दोन मुलं, हसत खिदळत उभी. त्यांच्याकडे बघून हसू आलं. आम्ही तिघे जेव्हा गप्पा मारतो, तेव्हा ते मला "पप्पा" म्हणतात खरं, पण ते संभाषण बापलेकाचं उरतच नाही — दोन जुन्या दोस्तांच्या गप्पा वाटतात. कधी तेच मला मोबाईलमधलं नवीन काहीतरी शिकवतात, कधी शांत राहायला सांगतात. 

मी पेटी बंद करत होतो, तितक्यात मनात ठरवलं — या सगळ्या आठवणी अशाच धुळीत गाडून ठेवायच्या नाहीत. त्या लिहून काढायच्या. या लेखात मी कोणाचंही नाव घेणार नाही — कारण हे कुणाचं अभिनंदन नाही, हा सलाम आहे त्या प्रत्येकाला, जो माझ्या आयुष्याच्या एखाद्या वळणावर माझ्यासोबत काही पावलं चालला. काही शेवटपर्यंत चालत राहिले, काही मध्येच वेगळ्या वाटेने निघून गेले, काही आजही सोबत आहेत, आणि काही आता फक्त या अल्बमच्या पानांत उरलेत.

चहाचा शेवटचा घोट घेतला आणि मनाशी एक कबुली दिली — मी अधिकारी आहे, वडील आहे, पती आहे, मुलगा आहे — ही माझी ओळख आहे. पण मी मित्र आहे — ही माझी खरी ओळख आहे. आणि जर आयुष्य पुन्हा जगायची संधी मिळाली, तर मी देवाकडे पैसा, पद किंवा प्रतिष्ठा मागणार नाही. फक्त एवढंच म्हणेन, "देवा... पुन्हा तेच मित्र दे, बाकीचं मी पुन्हा कमावेन."

आणि याच विचारात असताना, अल्बमच्या पहिल्या पानावरचा तो धुळकट माळरानाचा फोटो पुन्हा डोळ्यासमोर आला. गोष्ट तिथूनच सुरू होते — माझ्या गावातून. 

गावाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर आधी येते ती धूळ — उन्हाळ्यातल्या दुपारी पायाखाली उडणारी, आणि संध्याकाळी खेळून घरी परतताना अंगावर चिकटलेली. त्या धुळीतच माझी पहिली मैत्री जन्माला आली.

मला अजूनही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस. मी रडत बसलो,शेजारी एक मुलगा तसाच रडत बसला होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं — त्याचे डोळे ओले, माझेही ओले. आणि कुणीतरी हळूच हसलं. बहुतेक जगातली पहिली मैत्री अशीच अश्रूंतून जन्माला येत असावी.

वर्षांमागून वर्षं गेली. मी शहरात गेलो, नोकरीला लागलो, मोठ्या खुर्चीवर बसलो. पण गावात परत गेलो की एक गोष्ट कधीच बदलली नाही. एकदा असाच गावात गेलो होतो, आणि दूरवरून एक आवाज आला — "ओळखलंस का रे?" मी वळून बघितलं, तर एक जुना मित्र हातातलं काम टाकून धावत आला. गळाभेट घेतली. दोन मिनिटं आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. मग तो हसत म्हणाला, "अरे, टीव्हीवर अधिकारी दिसतोस, पण मला अजूनही तू चौथीतला दंगा करणारा संत्याच दिसतोस." मीही हसलो, पण मनात एक जाणीव झाली — जगात हीच एक जागा आहे जिथे माझी ओळख माझ्या पदाने नाही, तर माझ्या बालपणाने आहे.

आज हे मित्र वेगवेगळ्या वाटांनी गेले आहेत — कोणी शेती करतो, कोणी दूध व्यवसाय सांभाळतो, कोणी परदेशात स्थायिक झालाय. पण भेटलो की "किती कमावतोस" किंवा "किती एकर आहेत" असं कोणी विचारत नाही. पहिलं वाक्य असतं — "चल... आधी चहा घेऊ." गावातला चहा हे पेय नाहीच, तो एक विधी आहे, संवाद सुरू करण्याचा.

माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याच्या मनात एक लहान मुलगा कायम जिवंत असतो. माझ्या त्या लहान मुलाचं नाव आहे — "गावाकडचा मित्र." माझ्या गावाने मला जन्म दिला, पण माझ्या मित्रांनी मला माणूस बनवलं

न कळत बालपण मागे पडायला लागलं. वर्ग मोठा झाला, गुरुजींचा आवाज मोठा झाला, आणि जबाबदारीही. पूर्वी आई विचारायची, "डबा घेतलास?" आता बाबा विचारू लागले, "अभ्यास केलास?" आणि त्या दोन प्रश्नांच्या मधोमध बालपण आणि तारुण्य यांच्यातला एक अदृश्य पूल तयार झाला.

आठवतं मला, दहावीचा निकाल लागला त्या दिवशी. वर्गाबाहेर सगळे जमलेले, कुणाच्या डोळ्यांत आनंद, कुणाच्या डोळ्यांत काळजी. त्या दिवशी पहिल्यांदा कळलं की आता रस्ते वेगळे होणार. कोणी शहरात जाणार, कोणी गावातच राहणार. एक मित्र माझ्याजवळ आला, खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "जिथे कुठे जाशील, विसरू नकोस." मी हसलो, पण मनातून हललो. तेव्हा कळलं नव्हतं, पण आज कळतं — रस्ता वेगळा झाला म्हणजे नातं संपत नाही, ते फक्त भेटींची वारंवारता कमी करतं.

आज त्या मित्रांना भेटतो, तेव्हा कुणाच्या केसांत रुपेरी झाक दिसते, कुणाचं पोट सुटलेलं दिसतं. आणि गंमत म्हणजे, प्रत्येकजण दुसऱ्याकडे बघून म्हणतो, "अरे, तू खूप बदललास!" पण आतला तो तेरा-चौदा वर्षांचा मुलगा मात्र आजही तसाच असतो — तेवढाच खोडकर, तेवढाच निरागस.

मग आलं ज्युनिअर कॉलेज. वर्गात पाऊल ठेवलं आणि जाणवलं, इथे प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न चमकत होतं. शेजारचा बाकावरचा मुलगा रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा — डॉक्टर व्हायचं होतं त्याला. दुसरा नकाशे आणि आकडेमोडीत रमलेला — इंजिनिअर व्हायचं स्वप्न. आणि मी? मला फक्त एवढंच माहीत होतं, आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय.

आज मागे वळून बघतो, तर अंगावर रोमांच उभे राहतात. तो अभ्यासू मुलगा आज देशातला नामवंत डॉक्टर आहे, हजारो रुग्णांना त्याने नवजीवन दिलंय. तो नकाशांत रमणारा मुलगा आज आयआयटीयन म्हणून जगभर आपला ठसा उमटवतोय. पण जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा सुरुवातीची दोन मिनिटं जरा औपचारिक जातात — "कसा आहेस?", "काय चाललंय?" — आणि मग अचानक कुणीतरी जुना किस्सा काढतो, आणि एका क्षणात तो सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर पुन्हा वही विसरणारा विद्यार्थी होतो, आणि मीही माझं पद विसरून पुन्हा त्या वर्गात जाऊन बसतो. तेव्हा जाणवतं — पदं माणसाला मोठं करतात, आठवणी त्याला पुन्हा लहान करतात.

एकदा एका जुन्या मित्राने मला बाजूला घेतलं आणि हसत म्हणाला, "अरे... तुझं हस्ताक्षर अजूनही तसंच वाईट आहे का?" एका वाक्यात माझा सगळा अहंकार जमिनीवर आला! अशा मित्रांवर रागवावं की त्यांचे आभार मानावेत, हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही.

बारावी संपली, आणि आयुष्याने माझा हात धरून एका नव्या दुनियेत नेऊन सोडलं — कृषी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये. "हॉस्टेल" हा शब्द ऐकला की आजही ओठांवर हसू येतं. ती नुसती इमारत नव्हती, ती एक वेगळीच दुनिया होती. प्रत्येक खोलीत एक कथा होती. 

कृषी महाविद्यालयाने आम्हाला शेतीचं विज्ञान शिकवलं, पण त्याहून मोठी गोष्ट शिकवली — माणसांची मशागत. पीक कसं वाढतं, हे पुस्तकातून शिकलो, पण माणूस कसा फुलतो, हे मित्रांकडून शिकलो. आज त्या बॅचमधला प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहे — कोणी प्रशासनात, कोणी सैन्यात, कोणी शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवतोय. पण आम्ही भेटलो की आजही पहिल्यांदा पद विचारत नाही, पहिल्यांदा मिठी मारतो.

आणि त्या मिठीत मला नेहमी एकच भावना जाणवते — रक्ताच्या नात्यांना जन्म लागतो, पण काही नाती अशी असतात, ज्यांना फक्त एकच ओळख पुरेशी असते — मित्र. आज माझ्या आयुष्याच्या वहीत सर्वात सुंदर पान कोणतं असेल, तर त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलेलं असेल — "कृषी महाविद्यालय कोल्हापूर, K-95." कारण त्या चार अक्षरांत माझं तारुण्य आहे, माझे संघर्ष आहेत, आणि माझे आयुष्यभराचे मित्र आहेत.

हॉस्टेलचं ते जग मागे राहिलं, आणि पुढे वाट होती नोकरीची — जिथे खुर्च्या बदलणार होत्या, गावं बदलणार होती, आणि मैत्रीची खरी परीक्षा सुरू होणार होती.

पदवी हातात घेऊन कृषी महाविद्यालयातून बाहेर पडलो, तेव्हा डोळ्यांत स्वप्नं होती आणि मनात एकच इच्छा होती — "आता काहीतरी करून दाखवायचं." सरकारी सेवेत रुजू झालो, आणि वाटलं, आज मला नोकरी मिळाली. पण काही वर्षांनी कळलं — नोकरीपेक्षा मोठी गोष्ट मला मिळाली होती, माणसं.

पहिली बदली झाली, तेव्हा मन खट्टू झालं होतं. वाटलं, इथून निघालो म्हणजे सगळं संपलं. सामान बांधताना डोळ्यात पाणी आलं होतं. पण नव्या शहरात पाऊल ठेवलं, आणि हळूहळू लक्षात आलं — प्रत्येक बदली म्हणजे आयुष्याचं एक नवं प्रकरण असतं. नवं कार्यालय, नवे सहकारी, आणि नकळत नवे मित्र. आजही मला अनेक कार्यालयांच्या इमारती आठवत नाहीत, पण तिथले चेहरे मात्र स्पष्ट आठवतात.

एक किस्सा आठवतो. एका ठिकाणी मी रुजू झालो, तेव्हा काही लोक माझ्याभोवती सतत घुटमळत असायचे. माझ्या वाढदिवशी सगळ्यात आधी त्यांचाच पुष्पगुच्छ यायचा, कार्यक्रमात पहिल्या रांगेत तेच बसायचे. मी हसलो की ते हसायचे, मी गंभीर झालो की तेही गंभीर व्हायचे. वाटायचं, "वा! किती आपली माणसं आहेत!" पण पुढच्याच बदलीत त्या "आपल्या माणसांचा" मोबाईल नेटवर्कच जणू गायबच झालं! सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर हसू आलं — कारण उमगलं, काही माणसं आपल्या आयुष्यात पाहुणे म्हणून येतात, आणि आपणच त्यांना घरचं समजून बसतो. खुर्ची अधिकार देते, पण माणुसकीच मित्र देते.

याच काळात एक रात्र आठवते. मध्यरात्री बारा वाजता एका सहकाऱ्याला अचानक गरज पडली, आणि मी फोन लावला. पलीकडून पहिलाच प्रश्न आला — "कुठे यायचं?" कुठलेही आढेवेढे नाहीत, कुठलेही प्रश्न नाहीत. तेव्हा कळलं — प्रत्येक सहकारी मित्र नसतो, पण प्रत्येक खरा मित्र आयुष्यभराचा सहप्रवासी असतो.

वर्षं जात राहिली. एक दिवस घरी बसलो असताना, तोच जुना फोटो अल्बम पुन्हा हातात आला — याच गोष्टीच्या सुरुवातीला उघडलेला. पंधरा-सोळा मित्रांचा तो फोटो. एकेकाला शोधत गेलो — हा आता पुण्यात आहे, हा अमेरिकेत, हा अजूनही गावातच. आणि मग एका चेहऱ्यावर नजर थबकली. हसरा चेहरा, पण आता तो मित्र कुठेच नाही. तो आता फक्त याच फोटोत उरलाय.

त्या क्षणी मनात एक जाणीव उमटली — फोटो कधी म्हातारे होत नाहीत, फोटोतली माणसं होतात, आणि काही फोटोतच कायमची राहून जातात. मोबाईल उघडला, स्क्रोल करत गेलो, आणि त्याच्या नावावर बोट थांबलं. मन म्हणालं, "फोन कर." बुद्धी म्हणाली, "आता उत्तर कोण देणार?" तो नंबर डिलीट करण्याची हिंमत आजपर्यंत झाली नाही — कारण तो नंबर नाही, ती एक आठवण आहे.

या सगळ्या प्रवासातून मी एक गोष्ट शिकलो — मित्रांवर प्रेम आहे हे सांगण्यासाठी श्रद्धांजलीची वाट बघू नये. आजच फोन करा. आजच भेटा. आजच मिठी मारा. कारण जी माणसं आज आपल्यासोबत आहेत, ती उद्याही असतीलच, याची कोणतीही हमी नसते.

आज संध्याकाळी मी पुन्हा त्याच बाल्कनीत बसलोय, हातात चहा नाही, पण मन तेच आहे — शांत, कृतज्ञ. अल्बम बंद केलाय, पण त्यातल्या प्रत्येक चेहऱ्याने माझ्या आयुष्याचा एक तुकडा घडवलाय. माझ्या हसण्यात त्यांचा आवाज आहे, माझ्या विचारांत त्यांचा अंश आहे.

आनंदात टाळ्या वाजवणारे शेकडो मिळतात,पण दुःखात हात घट्ट धरणारे मात्र फार थोडे असतात. मी भाग्यवान आहे दुःखात,संकटात हात देणारे मित्र सोबत आहेत.


मैत्री दिनाच्या सर्व मित्रांना शुभेच्छा

लेखक : संतोष जिरगे 

9503038272