LIVE UPDATES

‘प्रेमाचा दागिना..!’

आजी-आजोबांच्‍या प्रेमात पडला अवघा महाराष्‍ट्र !
Edited by: स्वप्नील परब
Published on: June 19, 2025 13:14 PM
views 178  views

संभाजीनगर : ‘प्रेम’ या दोन अक्षरांत, एवढं सामावलंय की, देहाची राख होईपर्यंत अन्‌ त्‍यानंतरही हे अक्षर चिरंतन राहतं. आयुष्‍यभर कष्‍टानं संपूर्ण शरीरावर पडलेल्‍या सुरकुत्‍या अनुभव गाठीशी घेऊन चालत असतात. एका आजोबांची अशीच एक कथा, आजीसाठी दागिना खरेदी करण्‍यासाठी त्‍यांची धडपड अवघ्‍या महाराष्‍ट्राने पाहिली, अन्‌ प्रत्‍येकाचे डोळे पाणावले! मुलांच्‍या प्रेमापासून दुरावलेल्‍या या वयाने थकलेल्‍या पती-पत्‍नीचं प्रेम अन्‌ डोळ्यांतील निर्मळ, निष्‍कलंक भाव एक प्रेमकहाणी जी काळालाही हरवू शकली नाही आणि एका सोनाराच्या माणुसकीची झलक जी अजूनही समाजात जिवंत आहे हे अधोरेखित करणारी ही सत्‍यकथा मन हेलावून टाकणारी आहे. 


समाज माध्यमांवर मागील दोन दिवसांपासून या आजी आजोबांना सोन्याचे दागिने दिलेला व्हिडिओ लोकप्रिय होत आहे. सदर व्हिडिओत असलेल्या आजी आजोबांचे नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असं आहे. हे दोघेही भीक मागून उदरनिर्वाह करत असतात. पैसे मागण्यासाठी गोपिका ज्वेलर्स इथं गेले होते. यावेळी आजोबांना आजीसाठी दागिना घ्यायची इच्छा झाली. त्यांनी एक पोत पाहिली. त्यावेळी दुकान मालकानं त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडं पैसे कमी होते. मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून दुकान मालकानं त्यांना एक ग्रॅम सोन्याचा पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या दिल्या. यानंतर आजी आजोबांनी स्वत:जवळ असलेले पैसे दुकान मालकांसमोर ठेवले. मात्र, दुकान मालक निलेश खिवंसरा यांनी त्यातील फक्त वीस रुपये घेतले.


या दांपत्याचे नाव निवृत्ती सखाराम शिंदे व शांताबाई निवृत्ती शिंदे असून ते अंभोरा जहागीर (ता. मंठा, जि. जालना) येथील रहिवासी आहेत. हे वृद्ध दांपत्य नेहमी एकमेकांसोबत असतात. त्यांचा मुलगा दारू पितो आई वडिलांना सांभाळत नाही. निवृत्ती सखाराम शिंदे व शांताबाई निवृत्ती शिंदे हे दोघे ही संभाजीनगर शहरात भिक्षा मागून उदर निर्वाह करतात. गावाकडे कधी तरी येतात, मात्र मुलगा सांभाळत नसल्याने दोघे ही नेहमी बाहेर पैसे मागत फिरत असतात,अस गावकर्‍यांचे म्हणणं आहे.

आजी आजोबा मागतात भीक 

आजी आजोबा सध्या गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करतात. त्यांचं नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असं आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ते रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार होता. मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचं निधन झालं. तर, दुसरा मुलगा व्यसनी असल्यानं त्यानं आई वडिलांचा सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळं त्यांनी आपलं घर सोडत छत्रपती संभाजीनगर गाठलं. सध्या ते गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून जीवन जगत आहेत. मागील काही वर्षांपासून शहरातील वेगवगेळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात. औरंगपुरा भागात बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या ९३ वर्षीय आजोबांची इच्छा झाली. त्यासाठी ते गेले असताना एका दुकानात त्यांचे कपडे पाहून त्यांना एक रुपया दिला आणि दुसऱ्या ठिकाणी दुकानात त्यांना दागिना मिळाला.


दोन दिवसांमध्ये कोट्यवधी लोकांनी त्यांचा व्हिडिओ पाहिला. त्यातील आजी आजोबा रस्त्यावर दिसताच अनेकांनी त्यांची विचारपूस केली. काही जण सेल्फी काढून घेत आहेत. तर काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत देखील केली. "हे सगळ आपल्यासाठी विचित्र आहे. या सगळ्याचा त्रास होतोय. त्यादिवशी आम्हाला माहिती नव्हत की, साक्षात गजानन महाराजांची कृपा होईल. दागिना कितीचा माहिती नाही. मात्र आम्हाला आनंद झाला," निवृत्ती शिंदे या आजोबांनी सांगितलं. आजी आजोबांना एका दागिन्याची मदत झाली. मात्र त्यांना कोणी निवारा देईल का? हा खरा प्रश्न आहे.