
कुडाळ : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच, कुडाळमधील बऱ्याच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-पुण्याहून येणारे चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थांना प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी यापूर्वीच खड्डे बुजवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून सुरू असलेली संथ गती आणि निकृष्ट दर्जाची कामे यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, याचा जास्तीचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सहकाऱ्यांसह थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धाव घेतली.
रस्त्यांच्या या बिकट परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक अभिषेक गावडे यांच्यासह आबा धडाम, चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, बाबा तेली आणि अनेक कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित झाले होते. मात्र, या गंभीर समस्येवर जाब विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेवकांना संबंधित अधिकारी पिसाळ कार्यालयात अनुपस्थित आढळले. अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि कार्यालयातील वातावरण चांगलेच तापले.
या संपूर्ण प्रकारानंतर फोन वर संपर्क साधला असता अधिकारी पिसाळ यांनी सायंकाळी ४ वाजता भेटीची आणि चर्चेची वेळ निश्चित केली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांच्या कामांमधील दिरंगाई आणि भोंगळ कारभाराबाबत आता सायंकाळच्या बैठकीत काय चर्चा होणार आणि प्रशासन काय ठोस भूमिका घेणार, याकडे संपूर्ण कुडाळवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.










