
मातीच्या आखाड्यात उतरून प्रतिस्पर्ध्याला चितपट करणारी... राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा उंचावणारी... गळ्यात ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची माळ घेणारी... कुस्तीच्या क्षेत्रात ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळख निर्माण करणारी अश्विनी मनोहर पौळ...!
आज मात्र तिच्याच आयुष्याचा शेवट मनाला चटका लावून जाणारा ठरला आहे. अश्विनी यांच्या वडिलांना कुस्तीची आवड होती. त्यामुळे मुलीने कुस्तीमध्ये नाव कमवावं, यासाठी त्यांनी जिद्दीने घरीच कुस्तीची तालीम उभी केली. याच तालमीतून अश्विनींच्या कुस्तीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
मातीशी नातं जोडत... घाम गाळत... अनेक अडचणींवर मात करत अश्विनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या. २००७ मध्ये तिरुवनंतपुरम, केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवलं. यानंतर २००८ मध्ये गुरुदासपूर, पंजाब आणि २००९ मध्ये चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. पण त्यांचा विजयाचा प्रवास इथे थांबला नाही.
भोपाल, कानपूर, हरियाणा, बालेवाडी, कन्याकुमारी आणि सैफई अशा विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या कुस्तीचा ठसा उमटवला. मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर त्यांच्या कारकिर्दीत ५ सुवर्ण पदकं आणि ६ रौप्य पदकं जमा झाली...! महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अश्विनी पुढे मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलात नोकरी करू लागल्या.
एकीकडे क्रीडा क्षेत्रातील यश... दुसरीकडे नोकरी... आणि कुटुंबाची जबाबदारी... आयुष्य पुढे सरकत होतं. पण या यशस्वी महिला कुस्तीपटूच्या मनात नेमकं काय सुरू होतं? हा प्रश्न आज प्रत्येकाला अस्वस्थ करतोय. कारण अश्विनी यांनी आपल्या मुलांसह आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
मुलांसाठी आई म्हणजे आधार...आई म्हणजे माया... आई म्हणजे संपूर्ण जग... मग त्या माऊलीच्या मनात अशा कोणत्या वेदना साचल्या होत्या, की तिला आयुष्यच संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला? मुलांना शेवटचा घास भरवताना त्या आईच्या काळजात काय वादळ उठलं असेल? याची कल्पनाही करवत नाही... अश्विनी यांच्या वडिलांनी त्यांच्या पती आणि सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आखाड्यात लढणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ आयुष्याच्या आखाड्यात एकटी का पडली? जिने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना हरवलं... जिने महाराष्ट्रासाठी पदकं जिंकली... जिने संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण केली... ती स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष मात्र का हरली? कदाचित तिच्या चेहऱ्यावर हसू होतं... पण मनात वेदनांचा डोंगर होता. कदाचित ती मदतीची वाट पाहत होती... आणि म्हणूनच आज तिच्या पदकांपेक्षा मोठा प्रश्न तिच्या मृत्यूमागे उभा आहे. तिच्या वेदना कुणालाच का दिसल्या नाहीत? आणि त्यांच्या या दुर्दैवी अंताने मागे ठेवलेल्या प्रश्नांचं उत्तर शोधणं, ही आता समाजाची आणि यंत्रणेची जबाबदारी आहे.
लेखक : लक्ष्मण आडाव














