LIVE UPDATES

कारवाई करून दाखवा , आम्ही नावं जाहीर करतो : सुशांत नाईक

अवैध दारूधंद्यांवरून पालकमंत्र्यांना खुले आव्हान ; आंबा भरपाईसह देवगडच्या विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 10, 2026 16:00 PM
views 58  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  आंबा बागायतदारांच्या आंदोलनानंतर शासनाने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. साडेसात हजार शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेले असून, त्यांची नुकसान भरपाई तातडीने जमा करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. नुकसान भरपाईसाठी पुन्हा आंदोलनाची वेळ आली, तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शासकीय विश्रामगृह, देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, माजी नगरसेवक विकास कोंयडे, हर्षा ठाकूर आदी उपस्थित होते.सहा महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. 

त्यानंतर शासनाने हेक्टरी २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, काही ठिकाणी अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. गणपतीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. पुढील आंबा हंगामाची तयारी सुरू असून, खत, औषधे व फवारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक गरज आहे. अशा परिस्थितीत मागील वर्षीच्या नुकसानीची भरपाई रखडणे ही गंभीर बाब असल्याचे नाईक यांनी सांगितले.

नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी काही आमदार, पालकमंत्री, पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. मात्र, आता ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासनाने तातडीने कार्यवाही करून केवायसी पूर्ण झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अवैध दारूधंद्यांवर कारवाईचे आव्हान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारूधंद्यांच्या प्रश्नावरही नाईक यांनी टीका केली. भाजपच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात अवैध दारूधंद्यांचा विषय चर्चेला आला. पोलिस अधीक्षकांकडूनही या विषयावर चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात अवैध दारूधंदे सुरू असल्याचे सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीच मान्य करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

अवैध दारूधंद्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत, अशा धंद्यांशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे काही सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांची नावे आपण जाहीर करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. या व्यक्तींवर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी पालकमंत्र्यांना दिले. सिंधुदुर्ग जिल्हा नशामुक्त करण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची मागणीही त्यांनी केली.

 बंद पडलेल्या प्रकल्पांवरून टीका

देवगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत उद्घाटन झालेल्या अनेक प्रकल्पांपैकी काही प्रकल्प बंद पडले असल्याचा आरोप नाईक यांनी केला. विजयदुर्ग-मुंबई फेरीसह विविध प्रकल्पांवर खर्च करण्यात आला, उद्घाटने झाली आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या; मात्र, त्यांचा पुढील विकास झाला नाही, अशी टीका त्यांनी केली.पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात एकही ठोस रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्प आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी पार पाडण्यात अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला.

देवगडमधील जमीनविक्रीच्या बॅनरवरून सवाल
        देवगडमध्ये ‘देवगड प्रॉपर्टी उत्सव’ अशा स्वरूपाचे बॅनर लावण्यात आले असून, त्यावर पालकमंत्री नितेश राणे यांचा फोटो असल्याचे सांगत नाईक यांनी जमीनविक्रीच्या कार्यक्रमावरून सवाल उपस्थित केला. देवगडची जमीन अशा पद्धतीने विक्रीसाठी वापरली जात असेल, तर त्याला पालकमंत्री व आमदार म्हणून विरोध करायला हवा होता, असे ते म्हणाले.देवगडमधील प्रस्तावित प्रकल्पाबाबतही त्यांनी टीका केली. 

या प्रकल्पाला मुख्यमंत्री स्तरावर मान्यता मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी तो अद्याप कागदावरच असल्याचा आरोप त्यांनी केला. देवगडच्या विकासाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध राहील, असे नाईक यांनी स्पष्ट केले. या विषयावर विधानसभेत आवाज उठवून मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 शिवसेना ही कार्यकर्ता घडविणारी मशीन 

शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, केवळ कार्यकर्ते पक्षात घेऊन सिंधुदुर्गचा विकास होणार नाही, असे नाईक यांनी सांगितले. काही कार्यकर्त्यांना पैशांचे आमिष दाखवून, तर काहींना विविध प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी झालेली नसून, जिल्ह्यातील ३८० पैकी जवळपास ३३२ बूथप्रमुख नियुक्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 

नवीन कार्यकर्ते घडवण्याचे काम शिवसेना करीत राहील. कार्यकर्त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू राहिले, तर जनतेतून त्याला उत्तर मिळेल, असा इशाराही नाईक यांनी दिला.सिंधुदुर्गच्या जनतेने लोकप्रतिनिधींना रोजगारनिर्मिती व विकासाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्ते फोडण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.