
सावंतवाडी : नगरपरिषद प्रशासनाने सील केलेले गाळे पुन्हा उघडून संबंधित मालकाच्या ताब्यात दिल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी न.प. सभागृहाच्या बाहेर बसत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. संबंधितांवर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वेळप्रसंगी पूर्ण नग्न अवस्थेत बसेन असा इशारा त्यांनी मुख्याधिकारी यांना दिला.
सावंतवाडी न.प. च्या संकुलातील काही गाळे एकाच व्यक्तीला बेकायदेशीररीत्या दिल्याचा आरोप करत श्री. मुंज यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. याबाबत त्यांनी स्वातंत्र्य दिनी उपोषणाचाही इशारा दिला होता. यानंतर प्रशासनाने संबंधित गाळे सील केले होते. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता हे गाळे पुन्हा उघडण्यात आले असून संबंधित व्यक्तीकडून त्यांचा वापर सुरू झाल्याचा आरोप श्री. मुंज यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सभागृहाच्या बाहेर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही.
प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर पूर्ण नग्न अवस्थेत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, आज सभागृहात बैठक होत असून मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी त्यांची भेट घेतली. तसेच उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी देखील या प्रकराची दखल घेत सभागृहातून बाहेर येत माहिती घेतली. या प्रकरणानंतर प्रशासन आणि मुख्याधिकारी या प्रकरणी नेमकी कोणती भूमिका घेतात ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










