
कणकवली : गणेशोत्सव काळात कणकवली शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, ग्राहकांना सुरळीतपणे खरेदी करता यावी, यासाठी नगरपंचायतीतर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे. यात पार्किंगची व्यवस्था, गणेश घाटांवर कृत्रिम तलाव याचे नियोजन तसेच गणेश सजावट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली आहे.
मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रसिध्दिपत्रकानुसार, आप्पासाहेब पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदीर तसेच गांगोमंदीर ते मसुरकर किनई रोड व तेथून मुख्य बाजारपेठ हे रस्ते 'वन वे' असणार आहेत. हॉर्नबिल हॉटेल ते बाजारपेठ रोड, दोन्ह सर्व्हीस रोड, आप्पासाहेब पटवर्धन चौक ते पोलीस स्टेशन, धडाम दुकान ते अन्नपुर्णा बेकरी व मुख्य बाजारपेठ हे भाग 'नो पार्किंग' करण्यात आले आहेत.
दुचाकी व चारचाकी पार्किंगची व्यवस्था, हॉटेल मंजूनाथ, बँक ऑफ इंडिया, सह्याद्री हॉटेल, रामेश्वर प्लाझा यांच्या समोर उड्डाणपुलाखाली करण्यात आली आहे. बस, लक्झरी पार्किंची व्यवस्था नेहरूनगर, मराठा मंडळानजीक व नरडवे रोड येथे करण्यात आली आहे. मुख्य बाजारपेठेतील माल वाहतूक रात्री ८ ते सकाळी ९ या वेळेतच करता येणार आहे.
गणपती विसर्जनासाठी शहरातील मुख्य गणपती साना व मराठा मंडळ गणपती साना येथे कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. नद्यांचे प्रदुषण टाळण्यासाठी हे तलाव करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गणेश मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करावे. गणेश विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवण्यात येणार असून नागरिकांनी निर्माल्य नदीपात्राऐवजी या कलशांमध्ये विसर्जीत कराव्यात, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
तर शहराच्या मुख्य ठिकाणी आपत्ती निवारण संपर्क क्रमांकांचा बॅनर लावण्यात आला आहे. यामध्ये सामान्य प्रशासन, विद्यूत विभाग, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, स्वचछता विभाग, अग्निशमन विभाग यांचे नंबर असून कोणातीही समस्या असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
गणेश सजावट स्पर्धा
गणेशोत्सवानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक घरगूती गणेश सजावट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यात प्रथम पारितोषीक ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये असणार आहे. स्पर्धेचे स्वरुपही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.










