LIVE UPDATES

गणेशोत्सवासाठी देवगड आगारातील एसटीच्या १२१ नियमित फेऱ्या बंद

मुंबईला २३ बसेस रवाना; देवगड आगाराची २३ गाड्यांवर कसरत, ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 10, 2026 16:13 PM
views 40  views

देवगड : गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीच्या १४१ गाड्या मुंबईला पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध आगारांमधील नियमित प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, देवगड तालुक्यातील तब्बल १२१ नियमित एसटी फेऱ्या ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

देवगड आगारात एकूण ४६ बसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी २३ बसेस मुंबईला पाठविण्यात येणार असल्याने उर्वरित २३ बसेसच्या माध्यमातून देवगड आगारातील नियमित वाहतूक सुरू ठेवण्याची मोठी कसरत आगार प्रशासनाला करावी लागणार आहे. मुळातच आगारात कर्मचारी वर्ग अपुरा असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून डबल ड्युटी करून वाहतूक व्यवस्था सांभाळली जात आहे. त्यात नियमित फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांचा रोष एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

देवगड आगारातून पहिल्या टप्प्यात १०, दुसऱ्या टप्प्यात १९ आणि उर्वरित ३ अशा एकूण २३ बसेस मुंबईसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आगारातून देण्यात आली.

९ सप्टेंबरला १० फेऱ्या बंद

९ सप्टेंबर रोजी देवगड आगारातील एकूण १० नियमित प्रवासी फेऱ्या बंद करण्यात आल्या. यामध्ये ८ स्थानिक फेऱ्यांचा, तर लांब पल्ल्याच्या तुळजापूर आणि उमरगा या दोन फेऱ्यांचा समावेश आहे.

१० ते १३ सप्टेंबर या कालावधीत एकूण ३९ नियमित फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ३४ स्थानिक फेऱ्यांसह लांब पल्ल्याच्या पाच फेऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सकाळी ११.५० वाजताची बेळगाव, ११.३० वाजताची पणजी, सकाळी ९ वाजताची तुळजापूर, सकाळी ८.३० वाजताची रत्नागिरी आणि सकाळी ६ वाजताची उमरगा या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

१४ व १५ सप्टेंबर या दोन दिवसांत तब्बल ७२ एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचा समावेश असून, उर्वरित ७० फेऱ्या जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागांना जोडणाऱ्या स्थानिक प्रवासी फेऱ्या आहेत. अशाप्रकारे ९ सप्टेंबरला १०, १० ते १३ सप्टेंबरदरम्यान ३९ आणि १४ ते १५ सप्टेंबरदरम्यान ७२ अशा एकूण १२१ नियमित फेऱ्या बंद करण्यात आल्याने गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, देवगड आगारात कर्मचारी वर्ग अपुरा असतानाही उपलब्ध २३ बसेसच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठीही गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आगाराच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहिती देवगड एसटी विभागाच्या वतीने देण्यात आली.