
सावंतवाडी : निसर्गाची भरभरून उधळण आणि राजेशाही थाट लाभलेल्या सावंतवाडीच्या अगदी काळजात, काळाच्या ओघातही स्वतःचं गूढ आणि तेजस्वी रूप जपून ठेवलेलं एक ठिकाण म्हणजे सुमारे ३०० वर्षांचं जुनं श्री विठ्ठल मंदिर! शहराच्या धकाधकीतून जसे तुम्ही या मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवता, तसा थेट भूतकाळात नेणारा एक अद्भूत प्रवास सुरू होतो. दक्षिण कोकणात वारकरी भक्तीचा झेंडा फडकवणारं हे ३०० वर्षांचं हेरिटेज ठिकाण म्हणजे सावंतवाडीच्या कुशीत दडलेला एक असा अमूल्य खजिना आहे, जो पाहिल्याशिवाय कोकण भ्रमंतीचा थरार पूर्णच होऊ शकत नाही! कोकणात सहसा शैव (शंकराची) मंदिरे जास्त आढळतात, परंतु या मंदिरात वैष्णव आणि शैव संप्रदायाचा एक सुंदर मिलाफ पाहायला मिळतो, जो इथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक समन्वयाचा एक मोठा पुरावा आहे.
हे मंदिर सावंतवाडीच्या प्रसिद्ध मोती तलावाच्या अगदी जवळ वसलेले आहे. मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा सुमारे १३० फूट उंच असलेला भव्य कळस! कोकणातील बहुतांश मंदिरे ही कौलारू आणि कमी उंचीची असतात, पण या मंदिराचा हा उत्तुंग कळस दूरवरूनच नजरेत भरतो. सावंतवाडीवर राज्य करणाऱ्या भोसले संस्थानाची या मंदिरावर विशेष श्रद्धा होती. राजघराण्यातील राजे-महाराजे कोणत्याही महत्त्वाच्या युद्धापूर्वी, राज्यकारभाराच्या सुरुवातीला किंवा कौटुंबिक प्रसंगी इथे येऊन विठुरायाचा आशीर्वाद घेत असत. राजघराण्याने या मंदिराच्या देखभालीसाठी आणि नित्य नियमाने होणाऱ्या पूजेसाठी विशेष अन्नछत्रे आणि जमिनी इनाम म्हणून दिल्या होत्या.
आध्यात्मिक परंपरा आणि संतमहंतांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या सुंदरवाडी (सावंतवाडी) शहराच्या काळजात वसलेले श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर म्हणजे इतिहास, वास्तुकला आणि अखंड भक्तीचा एक अद्भुत संगम आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी (सन १७२५ मध्ये) सावंतवाडीचे राजघराणे आणि शहरातील विठ्ठलभक्तांच्या सहकार्यातून उभे राहिलेले हे मंदिर ‘कोकणातील प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. पंढरपूरच्या चंद्रभागेप्रमाणेच ऐतिहासिक मोती तलाव एकेकाळी थेट या मंदिराच्या पायापर्यंत विस्तारलेला होता. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे निवासस्थान या मंदिराच्या शेजारीच असून, त्यांच्या पूर्वजांनी व स्थानिक पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबांनी या मंदिराचे जतन करण्यात मोठे योगदान दिले. युद्धाच्या काळापासून ते विविध महाभयंकर संकटांपर्यंत, सावंतवाडीकरांना धैर्याने सामना करण्याचे आत्मबळ नेहमीच या स्थानातून मिळाले आहे.
मंदिराच्या चहुबाजूंनी नजरेत भरणारा तब्बल १३० फूट उंच कळस थेट नभाला गवसणी घालताना दिसतो. विशेष म्हणजे, १९८४ मध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरीशिवाय, भक्त भाऊ मसुरकर यांच्या पुढाकाराने आणि सर्व जाती-धर्मांच्या अवघ्या १३ माणसांच्या श्रमदानातून दत्तजयंतीच्या दिवशी हा भव्य कळस उभा राहिला, ही वास्तुकलेतील एक मोठी किमया मानली जाते. मंदिरात विठ्ठल-रखुमाईंसोबत शिवशंकर, गणपती, सूर्यनारायण आणि देवीचे ‘पंचायतन’ असून शेजारीच पिंपळाखाली हनुमंताचे देऊळ आहे. येथे समर्थ रामदास स्वामी, प.पू. टेंबे स्वामी, सोयरोबानाथ आंबिये, संत बहिणाबाई आणि कलावती आई यांच्या नयनरम्य मूर्तींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राची संतपरंपरा एकत्र पाहायला मिळते.
कीर्तन किंवा भजनाच्या वेळी कोणतीही आधुनिक ध्वनिवर्धक यंत्रणा नसतानाही, अगदी शेवटच्या कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीपर्यंत स्पष्ट आणि गोड आवाज पोहोचायचा. प्राचीन कारागिरांनी ध्वनीशास्त्राचा केलेला हा प्रयोग विज्ञानाला कोड्यात टाकणारा आहे.
स्वप्नील परब....














