LIVE UPDATES

पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबोलीत रविवारी ‘स्वच्छतेची वारी'

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे घेणार सहभाग : स्वच्छताप्रेमींनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 24, 2026 20:19 PM
views 39  views

सावंतवाडी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाट परिसरात स्वच्छता राखण्यासाठी रविवार, दि. २६ जुलै रोजी पूर्वीचा वस याठिकाणी  सकाळी 9.30 वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोलीच्या सहकार्याने आणि ‘स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग’ यांच्या पुढाकाराने ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, या स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित राहणार आहेत. आंबोली ग्रामपंचायत प्रशासक, माजी सरपंच सावित्री पालेकर यांच्या सहकार्याने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जि. प. सदस्या शोभा गावडे, तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी वैभव भिसे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, गटविकास अधिकारी निलेश जाधव, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे आणि चौकुळचे प्रशासक माजी सरपंच गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंबोली पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करतानाच पर्यटनस्थळाची स्वच्छता करण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात येणार आहे. आंबोली टुरिझम आणि आंबोली पर्यटन व्यावसायिक महासंघाचेही या उपक्रमाला सहकार्य लाभणार असून ते मोहिमेत सहभागी होणार आहेत.

‘पर्यटकांचे स्वागत करूया, पण कचरा न फेकण्याचे आवाहन करूया’ या संदेशातून आंबोलीचे निसर्गसौंदर्य आणि स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया, जिल्हाभरातील स्वच्छताप्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वच्छता मिशनचे निमंत्रक पत्रकार गणेश जेठे यांनी केले आहे.